

एका रुग्णाला इंजेक्शन न देण्यावरून सुरू झालेला गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील वाद अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शिष्टाईनंतर मंगळवारी मिटला. ईदच्या दिवशी एक रुग्ण गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या कॅज्युल्टी विभागात इंजेक्शन घेण्यासाठी गेला होता. तेथील मुख्य वैद्यकीय अधिकार्याने ‘हे काम कॅज्युल्टीत करायचे नसते, तुम्ही नागरी आरोग्य केंद्रात जा’ असा सल्ला दिला होता; मात्र डॉक्टर आपल्याशी अरेरावीने वागल्याची तक्रार रुग्णाने डीनकडे केली.
रुग्णाच्या तक्रारीनंतर डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ऑर्थोपेडिक विभागात त्या रुग्णाला इंजेक्शन देण्याची व्यवस्था केली. खरे तर, येथे या विषयाला पूर्णविराम मिळाला होता; मात्र त्या रुग्णाच्या नातेवाईकाने थेट आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे तक्रार केली की, कॅज्युल्टीतील डॉक्टरचे रुग्णांशी वागणे बरोबर नाही. ते बसून होते; पण त्यांनी इंजेक्शन दिले नाही. त्यानंतर आरोग्यमंत्री राणे यांनी गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला आकस्मिक भेट दिली व त्यांनी ऑन कॅमेरा तेथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना सर्वांसमोर झापले, त्यांचा अपमान केला, त्यांना लोकांशी नीट वागता येत नाही, सरकारी नोकर लोकांच्या सेवेसाठी असतात असे बरेच काही सुनावले व त्यांना तत्काळ निलंबित करत असल्याचे सांगितले. आताच्या आता त्यांनी आपल्या समोरून निघून जावे, अन्यथा सुरक्षारक्षकांना सांगून हाकलून देईन, असेही ते म्हणाले.
आरोग्यमंत्री गोवा मेडिकल कॉलेजमध्ये येण्यापासून ते निलंबनापर्यंतचा सर्व प्रसंग व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. डॉक्टरची चूक असल्याचे क्षणभर गृहीत धरले, तरी ज्याप्रकारे आरोग्यमंत्र्यांनी त्यांचा उपमर्द केला. त्यांच्या स्टाफसमोर अमानुष वागणूक दिली, त्यावर नाराजी व्यक्त झाली. समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली. त्यानंतर रात्री उशिरा खुद्द आरोग्यमंत्र्यांनी ‘मी रागाच्या भरात जरा जास्त बोललो, मी डॉ. कुट्टीकर व कुटुंबीयांची माफी मागतो; पण गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेणार नाही’ याचा पुनरुच्चार केला.
विरोधी पक्षांनी आरोग्यमंत्र्यांवर टीका केली व मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा सूचना केल्या. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मंत्र्यांचा निषेध केला. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयातही लेखी तक्रार केली. वाढता दबाव आणि जनक्षोभ लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी डॉ. कुट्टीकर यांचे निलंबन रोखले; मात्र हे प्रकरण हाताबाहेर गेल्याने अनेक वैद्यकीय संघटना पुढे आल्या व त्यांनी डॉ. कुट्टीकर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (जीएआरडी) या संघटनेनेही आरोग्यमंत्र्यांनी जिथे डॉक्टरांचा अपमान केला तिथेच येऊन त्यांची माफी मागावी, अन्यथा बेमुदत संप करू, असा इशारा दिला.
बांबोळीस्थित गोवा मेडिकल कॉलेज हे केवळ गोवाच नव्हे, तर आसपासच्या कारवार, सिंधुदुर्गपर्यंतच्या लोकांसाठी एक हक्काचे हॉस्पिटल आहे. डॉक्टर संपावर गेल्यास आरोग्यसेवा विस्कळीत होईल, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याप्रकरणी हस्तक्षेप केला व डॉक्टरांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. डॉक्टरांनी माफीनाम्यासह आणखी काही मागण्या पुढे केल्या. व्हिडीओग्राफी करणार्या कॅमेरामॅनविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. तसेच डीनच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. गोवा मेडिकल कॉलेजमधील व्हीआयपी संस्कृती संपवण्याचीही मागणी त्यात होती. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, वैद्यकीय कर्मचार्यांची अशाप्रकारे निर्भर्त्सना न करणे, कॅज्युल्टीत काम करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांना सुरक्षा देणे अशा मागण्या आहेत. सोमवार व मंगळवारी आंदोलन करणार्या डॉक्टरांना मुख्यमंत्री डॉ. सावंत भेटले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर डॉक्टरांनी बेमुदत संप मागे घेतला. तसेच आरोग्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी, ही मागणीही सोडून दिली आहे. तूर्तास हा (साग्र) संगीत मानापमानाचा प्रयोग आटोपता घेतला आहे.