सुशेगाद पर्यटकांचा जल्लोष

Goa Christmas New Year tourism
सुशेगाद पर्यटकांचा जल्लोषFile Photo
Published on
Updated on

मयुरेश वाटवे

नाताळ आणि नववर्ष हा गोव्यात पर्यटकांसाठी पर्वणीचा काळ असतो. सर्व प्रकारचे अनुभव येथे घेता येतात. नाताळचा आनंद, नववर्षअखेरीस होणारे संगीत कार्यक्रम तसेच गोव्यातील जत्रा, काले, धालोसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही पर्यटकांना अनुभवता येते.

गोवा हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात लोकप्रिय आणि आवडीने भेट दिले जाणारे पर्यटन स्थळ मानले जाते. अरबी समुद्राच्या सान्निध्यात वसलेले हे छोटेसे राज्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आले आहे. इथली निसर्गसंपदा, किनारे, खाद्यसंस्कृती, पोर्तुगीज वारसा, सण-उत्सव, संगीत, नृत्य, उदार मनाची माणसे आणि इथला निवांतपणा या राज्याला वेगळे स्थान मिळवून देते. विशेषत:, नाताळ आणि वर्षाचा शेवटचा काळ हा गोव्यातील पर्यटनाचा सुवर्णकाळ मानला जातो. जगाच्या कानाकोपर्‍यातून लोक या काळात गोव्याच्या दिशेने ओढले जातात. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता यांसारख्या महानगरांतील प्रवासीच नव्हे तर ब्रिटन, रशियासह इतर युरोपियन देशातील प्रवासीही या छोट्या राज्यात येत असतात. या काळात अनेक सेलिब्रिटी, कलाकार, इन्फ्लुएन्सर्स, बिझनेस टायकून, संगीत क्षेत्रातील दिग्गज लोकही गोव्याच्या जादुई वातावरणाचा आनंद घ्यायला येत असतात.

नाताळ जवळ आला की, गोव्याची हवा बदलते आणि हे वातावरण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहते. चर्च परिसरात आरास सजवली जाते, हॉटेल्समध्ये रोषणाई केली जाते, बाजारपेठांत उत्साह निर्माण होतो. किनारे गजबजतात. गोव्यात नाताळ अनुभवणे म्हणजे फक्त सण साजरा करणे नव्हे; एक जिवंत संस्कृती पाहता आणि अनुभवता येते. वर्ष अखेरच्या स्वागताची तयारी फार पूर्वीच होते. समुद्रकिनारी होणार्‍या पार्ट्या, खुले संगीत कार्यक्रम, लाईव्ह बँडस्, संगीत नृत्य महोत्सव यांनी गोवा दणाणून जातो. प्रसिद्ध बँडस्, संगीतकार, बॉलीवूड कलाकार, टीव्हीवर चमकणारे चेहरे या कार्यक्रमांना उपस्थिती लावत असतात. गोव्यात या वातावरणात एक वेगळाच तोल साधलेला दिसतो. एका बाजूला आलिशान पंचतारांकित हॉटेल्स, यॉटस्, कॅसिनो, क्रूझ आणि क्लब्सची धुंद दुनिया तर दुसर्‍या बाजूला शांत गल्लीबोळ, पांढर्‍याशुभ— चर्च, नारळाच्या बागा आणि छोटी ग्रामीण घरे. या छोट्या गावांत सुरू असलेले धालो, काले, जत्रा. प्रत्येक जण आपापल्या आनंदात रमलेला असतो. पर्यटकांचे एक वेगळे जग आणि स्थानिकांचे त्याहून वेगळे जग.

या दोन्ही जगांचा एक छान तोल राज्याने सावरलेला दिसतो. शहरांच्या धकाधकीतून पळून आलेला प्रवासी गोव्यात आल्यावर जणू काही स्वतःला परत भेटतो. कोणाला शांत सकाळी समुद्रकिनार्‍यावरील सूर्यस्पर्श अनुभवायचा असतो तर कोणाला खरेदी करायची असते, कॅफेमध्ये वेळ घालवायचा असतो. समुद्रातली सफर, मसाल्यांच्या बागेची सहल किंवा ऐतिहासिक वाडे, मंदिरे, चर्चेसना भेट द्यायची असते. गोवा हा पर्यटकांसाठी खाण्यापिण्याचाही स्वर्ग आहे, असे म्हणायला हरकत नाही. समुद्री खाद्यपदार्थ, कोकणी मसाले, बेबिंका, सोलकढी, काजू फेणी, पोर्तुगीज प्रभाव असलेले पदार्थ, छोट्या कॅफेपासून मोठ्या पंचतारांकित रेस्टॉरंटस्पर्यंत प्रत्येक ठिकाणी चवीचा उत्सव अनुभवता येतो. नाताळच्या आणि नववर्षाच्या आधीच्या दिवसांत तर खाद्यपदार्थांची विविधता विलक्षण वाढते. सेलिब्रिटी शेफ्स, खास मेन्यू, फॅमिली डिनर्सनी गोवाही आपल्यात हळूहळू उतरू लागतो.

गोवा ही एक भावना आहे. नाताळ, नववर्षाच्या या मोसमात तर ती परमोच्च आनंद देत असते. गोव्यातील आठवणी गोळा करण्याचा हा सर्वात चांगला कालावधी आहे. देश- विदेशातील पर्यटक सध्या त्याचा आनंद घेत आहेत. गोव्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथली माणसे. त्यांच्या चेहर्‍यावरचे हसू, मोकळेढाकळे आदरातिथ्य, विविधतेला दिलेले सुंदर आलिंगनच जणू. येथील उत्सवी जीवनशैली पर्यटकांच्या मनात घर करते. इथे प्रत्येक जण आपला वाटतो. कुणाच्याही जीवनात कोणतीही घाई-गडबड नाही. ‘सुशेगाद’ ही संकल्पना फक्त शब्द नाही तर इथल्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. म्हणूनच इथे आल्यावर मन शांत होते, मनातला गोंधळ संपून जीवनाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news