Goa Carnival 2026 | कार्निव्हलचे व्यावसायिकीकरण!

Goa Carnival 2026
Goa Carnival | कार्निव्हलचे व्यावसायिकीकरण!
Published on
Updated on

मयुरेश वाटवे

पर्यटकांचे आकर्षण असलेला गोवा कार्निव्हल 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. अलीकडच्या काळात कार्निव्हलचे व्यावसायिकीकरण झालेले असून महोत्सवाला त्यातून बाहेर काढत स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडले पाहिजे.

पुढच्या आठवड्यात 13 फेब्रुवारीपासून बहुप्रतीक्षित गोवा कार्निव्हल सुरू होत असून, हा उत्सव गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा, इतिहासाचा आणि पर्यटन अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. हा रंगतदार उत्सव केवळ मिरवणूक, संगीत आणि नृत्यापुरता मर्यादित नसून, तो गोव्याच्या मुक्त, आनंदी आणि बहुसांस्कृतिक जीवनशैलीचे प्रतीक मानला जातो. पर्यटकांबरोबरच स्थानिक गोमंतकीयांमध्येही या उत्सवाबद्दल आकर्षण कायम आहे.

मात्र, कालानुरूप कार्निव्हलचे स्वरूप बदलले. पूर्वी कार्निव्हलमधील चित्ररथ हे कल्पकतेचे, लोककलेचे आणि सामाजिक भाष्याचे उत्तम उदाहरण असायचे. ग्रामीण जीवन, लोकपरंपरा, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमा, तसेच विनोदी पद्धतीने मांडलेली सामाजिक टीका, हे सर्व चित्ररथांतून दिसायचे. आज मात्र मोठ्या प्रमाणावर कार्निव्हलचे व्यावसायिकीकरण झालेले दिसते. बहुतांश चित्ररथ हे कंपन्यांच्या जाहिरातींनी भरलेले असतात. रंगीत झगमगाट असतो; पण त्यामागील सांस्कृतिक आशय कमी झाल्याचे अनेकांना वाटते. तरीही ज्यांनी पूर्वीचा कार्निव्हल अनुभवलेला नाही, विशेषतः तरुण पिढी किंवा पहिल्यांदाच गोव्यात येणारे पर्यटक, त्यांच्यासाठी हा उत्सव आजही नवीन, आकर्षक आणि उत्साहीच असतो. संगीत, नृत्य, वेशभूषा आणि रस्त्यांवरील आनंदोत्सव पाहताना गोव्यातील मुक्त वातावरणाचा अनुभव त्यांना मिळतो. त्यामुळे कार्निव्हलचे आकर्षण कमी झाले आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. स्थानिकही कुटुंबासह कार्निव्हल पाहण्यासाठी बाहेर पडतात.

मार्च महिन्यात शिमगोत्सव म्हणजेच गोव्याचा पारंपरिक होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. शिमगोत्सवात ग्रामीण संस्कृती, लोककला, पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्ये आणि लोकसंगीत यांचे दर्शन घडते. गावोगावी निघणार्‍या मिरवणुका, रोमटामेळ, घोडेमोडणी, गडे नृत्य अशा लोककलांमधून गोव्याचा अस्सल ग्रामीण आत्मा प्रकट होतो. शिमगोत्सव हा जसा लोकांचा उत्सव आहे, तसाच तो संस्कृतीचे जतन करणारा उत्सवही आहे. कार्निव्हल आणि शिमगोत्सव हे दोन्ही गोव्याचे प्रमुख उत्सव आहेत; पण त्यांच्या स्वरूपात आणि उद्देशात फरक आहे. कार्निव्हल अधिक खुला, जागतिक स्वरूपाचा आणि पर्यटनाभिमुख आहे, तर शिमगोत्सव मुळाशी रुजलेला, पारंपरिक आणि ग्रामीण आहे. कार्निव्हलसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखल्या जाणार्‍या उत्सवातही गोव्याच्या ग्रामीण संस्कृतीचे, लोकजीवनाचे आणि परंपरेचे दर्शन अधिक प्रभावीपणे घडवता येऊ शकते.

कार्निव्हलमध्ये चित्ररथ आणायचेच असतील, तर त्यातून केवळ व्यावसायिक जाहिरात न होता, गोव्याची ओळख अधोरेखित झाली पाहिजे. कंपन्यांना जाहिरातीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असावीत. उदाहरणार्थ, जाहिरात करताना सांस्कृतिक थीम वापरणे, गोव्याच्या इतिहासाशी, लोककलेशी किंवा पर्यावरणाशी संबंधित संकल्पना मांडणे, अशा अटी पर्यटन महामंडळ घालू शकते. त्यामुळे जाहिरात आणि संस्कृती यांचा समतोल साधता येईल. आपल्या राज्याचा उत्सव कोणाच्या तरी पूर्णतः हाती देऊन त्याचा हवा तसा वापर होऊ देणे, हे दीर्घकालीन द़ृष्टीने योग्य ठरणार नाही. कार्निव्हल हा केवळ एक कार्यक्रम नसून, तो गोव्याची ओळख आहे. ही ओळख जपण्याची जबाबदारी सरकार, पर्यटन महामंडळ आणि स्थानिकांचीही आहे. उत्सव अधिक भव्य, अधिक आकर्षक आणि अधिक अर्थपूर्ण कसा होईल, याचा सातत्याने विचार व्हायला हवा. पर्यटन हा गोव्याचा प्रमुख व्यवसाय आहे आणि कार्निव्हलसारखे उत्सव गोव्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचे मोठे माध्यम ठरतात. गोव्याची खास संस्कृती, लोकजीवन आणि परंपरा यांचा अनुभव कार्निव्हलमधून पर्यटकांना मिळाला, तर तो उत्सव अधिक संस्मरणीय ठरेल. म्हणूनच येत्या काळात कार्निव्हलकडे अधिक गांभीर्याने आणि सर्जनशीलतेने पाहण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news