plankton glow satellite image |न्यूझीलंडच्या बेटांभोवती अवकाशातून दिसले प्रकाशाचे वलय

सूक्ष्म जीवांच्या ‘ब्लूम’मुळे समुद्र उजळला
plankton glow satellite image |न्यूझीलंडच्या बेटांभोवती अवकाशातून दिसले प्रकाशाचे वलय
Published on
Updated on

वेलिंग्टन : न्यूझीलंडजवळील एका दुर्गम बेट समूहाभोवती सूक्ष्म सागरी जीवांचे (प्लँक्टन) एक विलोभनीय आणि चमकणारे वलय उपग्रहाद्वारे टिपण्यात आले आहे. हे विलोभनीय द़ृश्य जेवढे सुंदर आहे, तेवढेच ते या भागात वारंवार होणार्‍या व्हेल माशांच्या मृत्यूच्या घटनांशी संबंधित असलेल्या एका विशिष्ट पाण्याखालच्या रचनेमुळे निर्माण झाले आहे.

प्रकाशाचे हे वलय प्रशांत महासागरातील ‘चॅथम बेटां’भोवती पाहायला मिळाले. ही बेटे न्यूझीलंडच्या मुख्य भूभागापासून सुमारे 840 किलोमीटर पूर्वेला आहेत. ‘नासा’च्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने टिपलेल्या या फोटोमध्ये चॅथम आणि पिट ही दोन मोठी बेटे स्पष्टपणे दिसत आहेत. या बेटांच्या सभोवताली ‘चॅथम राईज’ नावाचे पाण्याखालील एक विस्तीर्ण पठार आहे. हे पठार समुद्राच्या तळाशी एका विशाल ‘रॅम्प’प्रमाणे काम करते. यामुळे समुद्राच्या तळातील थंड आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेले पाणी पृष्ठभागावर येते.

उन्हाळ्यात जेव्हा वरचे उबदार पाणी या पोषक तत्त्वांमध्ये मिसळते, तेव्हा तिथे शैवाल आणि सूक्ष्म जीवांची झपाट्याने वाढ होते, ज्याला ‘अल्गल ब्लूम’ म्हटले जाते. या वलयात प्रामुख्याने ‘कोकोलितोफोर्स’ नावाचे प्रकाशसंश्लेषण करणारे सूक्ष्म जीव आहेत. हे जीव स्वतःभोवती कॅल्शियम कार्बोनेटचे एक गुंतागुंतीचे संरक्षक कवच तयार करतात. हे कवच सूर्यप्रकाश परावर्तित करत असल्याने अवकाशातून समुद्र दुधिया किंवा निळसर रंगाने चमकताना दिसतो. गेल्या काही दशकांतील हा सर्वात मोठा ‘ब्लूम’ असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेच ‘चॅथम राईज’ पठार या भागात व्हेल मासे मोठ्या संख्येने किनार्‍यावर येऊन मृत्युमुखी पडण्यासही कारणीभूत ठरते. या भागातील विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे समुद्राचे प्रवाह बदलतात आणि व्हेल माशांची दिशाभूल होते, ज्यामुळे या बेटांना ‘डेथ ट्रॅप’ असेही म्हटले जाते. उपग्रहाने घेतलेल्या या फोटोमध्ये निअर-इन्फ्रारेड फिल्टरचा वापर केल्यामुळे हे रंग अधिक गडद दिसत आहेत. परंतु, नासाच्या मते, हे वलय इतके विशाल होते की ते अंतराळातून उघड्या डोळ्यांनीही सहज दिसू शकले असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news