‘एआय’चा गौरव

रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर
glory of 'AI'
‘एआय’चा गौरवPudhari File Photo
Published on
Updated on

प्रश्न करणे कधी थांबवू नका, मला कल्पना ही ज्ञानापेक्षा शक्तिशाली वाटते. कारण, कल्पनाशक्तीच्या जोरावरच विज्ञानाची गृहितके मांडली जातात. या गृहितकांमुळे वैज्ञानिक शोध लागण्यास मदत मिळते. मानवाला मिळालेल्या मौल्यवान अशा अंतःप्रेरणेच्या देणगीमुळे विज्ञानाला गती मिळाली आहे, असे उद्गार जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काढले होते. या विश्वात अंतिम असे सत्य काही नाही. त्यामुळे ज्ञानाचा प्रवास अखंड व निरंतर असतो, ते परिवर्तनीय असते. प्रत्येकाने चूक करणे गरजेचे आहे. जो माणूस चूक करत नाही, तो कधीच शिकत नाही किंवा तो नवनवे असे काहीच निर्माण करू शकत नाही, हेही आईनस्टाईन यांचे मत होते. सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतेचा सिद्धांत त्यांनीच विकसित केला. ‘क्वांटम मेकॅनिक्स’ सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सापेक्षता आणि क्वांटम मेकॅनिक्स हे आधुनिक भौतिकशास्त्राचे दोन आधारस्तंभ आहेत. त्यांचे ई = एमसी2 हे सापेक्षता सिद्धांतातून तयार झालेले सूत्र जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखले जाते. आईन्स्टाईन यांच्या कार्याचा प्रभाव विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावरही पडला. ‘प्रकाशीय विद्युत परिणाम’ या सिद्धांतासाठी आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी आईन्स्टाईन यांना 1921 च्या नोबेल पुरस्काराने गौरविले होते. या आठवड्यातच रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर झाल्यामुळे या सर्व गोष्टींची आठवण होणे स्वाभाविक आहे.

डेव्हिड बेकर, डेमिस हसबीस आणि जोन जम्पर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या संशोधनामुळे प्रथिनांची रचना आणि अमिनो अ‍ॅसिडचा क्रमातील दुवा प्रस्थापित करता आला. रसायनशास्त्रातील आणि विशेष करून जैवरसायनशास्त्रातील ते एक मोठे आव्हान होते. म्हणूनच या संशोधनाचा सन्मान करण्यात आला आहे. बेकर हे सिएटल येथे वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत असून, हसबीस आणि जम्पर लंडनमध्ये ‘गुगल डीपमाईंड’मध्ये काम करतात. बेकर यांनी 2003 मध्ये नव्या प्रथिनाची रचना केली. तेव्हापासून त्यांच्या संशोधक गटाने संकल्पनांवर आधारित अनेक प्रथिनांची निर्मिती केली. त्यांनी ज्या प्रकारची विविध प्रथिने तयार केली, ती खरोखरच उत्कृष्ट होती. या तंत्रज्ञानाचा वापर करून कुठल्याही प्रकारची प्रथिने तयार करता येतील. गेल्यावर्षी रसायनशास्त्राचे नोबेल ‘क्वांटम डॉटस्’मधील कामासाठी तीन शास्त्रज्ञांना देण्यात आले होते. आईन्स्टाईन यांनी सांगितल्याप्रमाणे या वैज्ञानिकांनीही प्रश्न करणे थांबवलेले नाही. त्यांच्या मनात विलक्षण कुतूहल होते आणि मनातील प्रश्नांची त्यांनी संशोधनातून उकल केली. याचा माणसाला खूप उपयोग होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रणेते म्हणून ओळखल्या जाणार्‍या जेफ्री हिंटन तसेच जोन हॉपफिल्ड यांना यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा वापर करून मशिन लर्निंग क्षेत्राचा पाया या दोघांनी रचला. त्यांच्या या संशोधनामुळे ‘एआय’चे क्षेत्र विकसित होण्यास चालना मिळाली. या दोन्ही शास्त्रज्ञांनी सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा वापर करून कृत्रिम मज्जातंतूंचे जाळे तयार केले. त्यामुळे मोठ्या माहितीसाठ्यातील विशिष्ट नमुने कृत्रिमरीत्या लक्षात ठेवणे यंत्राला शक्य झाले आहे.

हिंटन हे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिक आहेत आणि त्यांनी टोरांटो विद्यापीठात संशोधन केले आहे, तर हॉपफिल्ड हे अमेरिकन आहेत. कृत्रिम मज्जातंतूचे जाळे तयार केल्यामुळे मोठ्या डेटामधील विशिष्ट नमुने मशिनला कृत्रिमपणे का होईना, पण लक्षात ठेवणे सोपे झाले. मानवी मेंदूमधील न्यूरॉन्सच्या रचनेवरून त्यांनी प्रेरणा घेतली. खरे तर, ‘एआय’मुळे कामात कमालीची अचूकता येऊ लागली असून, कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. या यंत्रांची कार्यक्षमता आणि आपोआप निर्णय घेण्याची क्षमता विलक्षण असून, हे सर्व अद्भुतच आहे. ‘एआय’मुळे मोठ्या प्रमाणात एकीकडे बेरोजगारी तयार होत असताना, दुसरीकडे नवनवीन क्षेत्रात रोजगारही निर्माण होत आहे; मात्र त्याचवेळी नोबेल समितीच्या सदस्यांनी संशोधनाची नकारात्मक बाबही अधोरेखित केली आहे. मशिन लर्निंगचे फायदे मोठे असले, तरी या क्षेत्रामध्ये झपाट्याने होणारा विकास भवितव्याबद्दल चिंता उत्पन्न करतो. मानवी समूहाला या तंत्रज्ञानाचे मोठे फायदे मिळणार असले, तरीही त्यासाठी नैतिक आणि सुरक्षित मार्गाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे, असे मत समितीने व्यक्त केले आहे. हिंटन यांनी या क्षेत्रातील नकारात्मक बाब किंवा धोके सर्वांना समजण्यासाठी गुगल कंपनी सोडली. ते आता मुक्तपणे ‘एआय’च्या क्षेत्रातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबींसंदर्भात जनतेचे प्रबोधन करत आहेत.

हिंटन यांनी ‘बोल्टझमन मशिन’चा शोध लावला. त्यामुळे डेटामधील नमुने ओळखता येतात. या शोधामुळे डेटामधील नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. जॉन हॉपफिल्ड यांनी ‘असोसिएटिव्ह मेमरी’ विकसित केली असून, ती प्रतिमा आणि अन्य प्रकारचे पॅटर्न्स साठवून त्यांची पुनर्निर्मिती करू शकते, तर हिंटन यांनी डेटा स्वयंचलितपणे विश्लेषित करण्याची पद्धत शोधली आहे. त्यामुळे प्रतिमांमधील विशिष्ट घटक शोधता येतात. ‘एआय’च्या जगात मशिन लर्निंगसाठी या न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो, ज्यात मानवी मेंदूची प्रेरणा घेतली आहे. हॉपफिल्ड आणि हिंटन यांनी कित्येक वर्षे या न्युरल नेटवर्कवर संशोधन केले. गेल्या काही वर्षांत नोबेल समितीने नेहमीची चाकोरी सोडून पुरस्कार दिले, याचे स्वागतच केले पाहिजे. उदाहरणार्थ, 2021 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल तीन हवामान शास्त्रज्ञांना प्रथमच देण्यात आले होते. कारण, जगापुढे हवामान बदलाचे संकट उभे आहे, याची नोंद समितीने घेतली. आज जगापुढे ‘एआय’मुळे संधी आणि आव्हान दोन्ही निर्माण झाले असून, याचा विचार करूनच हा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘एआय’मुळे उत्पादकता वाढतेच शिवाय त्याचा आरोग्य व अन्य सेवांसाठीही उपयोग आहे; पण त्याचवेळी हे तंत्रज्ञान भीषण प्राण्यांसारखे घातकही ठरू शकते, अशा इशारा या दोन्ही शास्त्रज्ञांनी दिला आहे, याचा विचारही करावा लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news