Smart Connect Strength Machine | एका टचवर हवा तसा व्यायाम...

Smart Connect Strength Machine |
Smart Connect Strength Machine | एका टचवर हवा तसा व्यायाम...
Published on: 
Updated on: 

आशिष शिंदे

जिममध्ये पाऊल ठेवताच कानावर पडणारा जड लोखंडी प्लेट्सचा खडखडाट, अस्ताव्यस्त डंबेल्स, वजन लावताना आणि काढताना होणारी दमछाक आणि जरासा तोल गेला तरी होणाऱ्या दुखापतींची टांगती तलवार... व्यायामशाळेतील ताकदीच्या (स्ट्रेंथ ट्रेनिंग) व्यायामाचे हे चित्र वर्षानुवर्षे जसेच्या तसे राहिले आहे. चांगल्या आरोग्यासाठी स्नायूंची ताकद कमावणे ही आज काळाची गरज बनली असली, तरी लोखंडी वजनांचा हा रुक्ष पसारा आणि अचूक मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक नवशिक्यांची पावले जिमच्या दारातच अडखळतात. त्यातच सध्या होम जिमच्या ट्रेंडमुळे घराघरांत अनेक हायटेक होम जिम अवतरल्या आहेत. नेमकी हीच गरज ओळखून, पारंपरिक लोखंडी वजनांना कायमचा पूर्णविराम देणारे आणि विजेच्या डिजिटल ताकदीवर चालणारे एक अत्यंत प्रगत ‘स्मार्ट कनेक्टेड स्ट्रेंथ मशिन’ आता गॅजेट वर्ल्डमध्ये अवतरले आहे.

या उपकरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एक ग्रॅमचेही प्रत्यक्ष लोखंडी वजन वापरलेले नाही. लोखंडाऐवजी यात अत्याधुनिक ‘ड्युअल सर्व्हो मोटर्स’ बसवल्या असून, त्या संपूर्णपणे डिजिटल रेझिस्टन्स (प्रतिरोधक क्षमता) निर्माण करतात. म्हणजे, तुम्हाला २० किलो वजन उचलायचे असो वा १०० किलो, प्लेट्स बदलण्याचा खटाटोप न करता स्क्रीनवर फक्त एका बोटाच्या स्पर्शाने हे वजन क्षणात ॲडजस्ट होते. वजन उचलून खाली ठेवताना होणारा आवाज, फरशी तुटण्याची भीती किंवा अंगावर वजन पडून होणाऱ्या गंभीर अपघातांची शक्यता या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शंभर टक्के नाहीशी झाली आहे. या उपकरणावर समोरच २४ इंचांचा मोठा हाय डेफिनिशन टचस्क्रीन आहे. तो केवळ आकडे दाखवणारा डिस्प्ले नसून एक निष्णात वैयक्तिक फिटनेस प्रशिक्षकच आहे.

व्यायामात शरीराची हालचाल योग्य दिशेने होत आहे का, प्रत्येक रॅपमध्ये किती ताकद लावली जात आहे, किती कॅलरीज जळाल्या आणि एकूण किती वजन उचलले गेले, याची सेकंदासेकंदाची नोंद स्क्रीनवर ठेवली जाते. नवशिक्यांपासून ते कसलेल्या खेळाडूंपर्यंत प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायामाचे मार्गदर्शन थेट स्क्रीनवर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते. स्नायूंच्या वैज्ञानिक वाढीसाठी या यंत्रात पाच वेगवेगळे लिफ्टिंग मोड्स दिलेत. साध्या लोखंडी वजनात वर नेताना आणि खाली आणताना एकाच प्रकारचा गुरुत्वाकर्षणाचा ताण असतो. मात्र, या उपकरणातील मोटर्स स्नायू आकुंचन पावताना आणि प्रसरण पावताना गरजेनुसार भार बदलू शकतात. यामुळे स्नायूंवर योग्य ताण येऊन दुखापतीचा धोका नगण्यच राहतो आणि कमीत कमी वेळेत सर्वोत्तम परिणाम साधता येतात.

वेगवेगळ्या व्यायामांसाठी १८० अंश बाजूला आणि ९० अंश खाली-वर फिरू शकणारे रोबोटिक हात असल्याने छाती, खांदे, पाठ आणि पायांचे शेकडो व्यायाम एकाच जागी उभे राहून करणे सहज शक्य होते. या ‘स्मार्ट कनेक्टेड स्ट्रेंथ मशिनमध्ये अत्यंत प्रगत ‘डिजिटल आणि रोबोटिक मोटर’ तंत्रज्ञानाची ताकद वापरली आहे. यातील ड्युअल सर्व्हो मोटर्स, स्मार्ट सेन्सर्स आणि अचूक सॉफ्टवेअर अल्गोरिदमच्या साहाय्याने वजनाचा भार नियंत्रित केला जातो. तुम्ही लावलेला जोर, व्यायामाची गती आणि शरीराचा ताण हे सेन्सर्स सेकंदाच्या भागात अचूक मोजतात. जागतिक बाजारपेठेत या अत्याधुनिक फिटनेस प्रणालीची किंमत भारतीय चलनात अंदाजे ४ लाख १५ हजार रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news