

सावित्री : (फोनवर) सिलिंडर मिळणे कठीण. चार दिवस झाले गॅस संपून. लाईटच्या शेगडीने सगळा भार उचलला आहे.
सखी : अगं, असं कसं?
सावित्री : गावचे लोक रिकामे सिलिंडरपण देईनात.
सखी : ते चुलीवर जेवण करतात. मग, शहरात लोकांना सिलिंडर का पाठवत नाहीत?
सावित्री : बघ बाई...
सखी : ये, त्या श्याम्याच्या टपरीवर असतील की टाक्या.
सावित्री : त्याच्याकडे व्यावसायिक गॅस सिलिंडर. काय करणार असून?
सखी : अगं, शेगडी घ्यावी लागली, तरी चालेल त्यासाठी; पण सिलिंडर पैसे देऊन पण मिळणार नाही, ते टेन्शन मिटेल ना?
सावित्री : खरंय. ट्राय करूया का?
सखी : चल जाऊन तरी येऊ त्याच्याकडे?
सावित्री : आलेच. देव करो सिलिंडर मिळो!
सखी : मिळेल गं. नाही तर चूल जिंदाबाद!
सावित्री : चल जाऊ. (टपरीकडे कूच )
सखी : श्याम्या भाऊ कामात आहात?
श्याम्या : नाही भातुकली खेळतोय. सिलिंडर संपले ना. उगी उगी गॅसवर भांडं ठेवायचं, गाळणीने चहा गाळायचा. फक्त अक्टिंग हो! गिर्हाईक तुटते म्हणून.
सावित्री : तुम्ही कधीपासून अॅक्टिंग...
श्याम्या : आता तेच करायला पाहिजे.
सखी : खरंच सिलिंडर नाहीत तुमच्याकडे?
श्याम्या : दोन आहेत; पण पंधरा दिवसाला लागतात हो. पुढे नाहीच मिळाले तर काय करणार? सगळीकडे हॉटेलवाल्यांनी चहा, नाश्ता बंद केला. महत्त्वाची गरज दोन वेळचे जेवण! बाकी पदार्थ तूर्तास बंद आहेत. म्हणून चहाच्या टपर्या जरा जोमात आहेत.
सावित्री : मग काय चिंता तुम्हाला? एखादे सिलिंडर द्या ना आम्हाला. सोय होईपर्यंत.
श्याम्या : सिलिंडर कसं देणार वहिणी. व्यवसाय आहे माझा.
सखी: त्यापेक्षा तुम्ही कॉलनीमधे टपरी चालू करा. इथे रिकामे बसण्यापेक्षा कॉलनीतले बरेच जण येतील चहासाठी. बर्याच जणांकडे गॅस सिलिंडर नाही. पाईपलाईनचे काम आता चालू झालं.
श्याम्या : मग ठीक. माझ्या व्यवसायाला हातभार. पण, पाटी लावली पाहिजे येथे चहा मिळेल! मग, तुम्ही स्वयंपाक केला तरी चालेल. तुम्हीच चालवायची. कबूल?
सावित्री आणि सखी : वाह! श्याम्याभाऊ! एक दगड दोन पक्षी. येथे चहा मिळेल! मस्त आयडिया आहे.