

भक्त : (नर्मदा नदी काठावर) हर हर गंगे, हर हर नर्मदे, जय हो जय हो..! (नर्मदेस दुग्ध अभिषेक करत)
पर्यावरणप्रेमी : तुम्ही हे काय करत आहात. चक्क दूध ओतत आहात नर्मदेत?
भक्त : अभिषेक म्हणतात या क्रियेस!
पप्रे : या क्रियेमुळे कित्येक जलचरांची दशक्रिया विधी होतेय. जरा पाण्यात उतरून बघा.
भक्त : मूर्ख बालक! तुझे हे अपशब्द ऐकायला मी आलो नाही इथे. समजले?
पप्रे : तुम्हाला समज द्यायची गरज आहे. कधीही काहीही करता भक्तीच्या नावाखाली...
भक्त : हे बघ, तू जे कोणी असशील, शब्द मागे घे नाही, तर कोप होईल माझा.
पप्रे : कोप काय बरोबरच घेऊन फिरता काय? कोपर्यात नेऊन बदड बदड बदडेन. बंद करा ते अभिषेक प्रकरण. आधीच गंगेची शुद्धीकरण प्रक्रिया चालू असताना इकडे नर्मदेत काय उच्छाद मांडलाय तुम्ही लोकांनी!
भक्त : काल एवढे टँकर ओतले दुधाचे तेव्हा कुठे होतात?
पप्रे : वातावरणनिर्मिती करणारे तुम्ही आहात. (बकोटी धरत) भक्तिभावाने सांगतो. बंद कर हे!
भक्त : माजला आहात रे नास्तिक तुम्ही. सरळ अंगावर येता? असेच लोक खून, मारामारी करत असतील याची दाट शक्यता वाटते मला.
पप्रे : तू जलचर, प्राणी, पक्षी मारत असशील भोंदूगिरी करत, याचीही खात्री वाटते.
भक्त : वाटून घे. मला काय त्याच्याशी.
पप्रे : तुलाही काय वाटते, त्याचे मी काय करू?
भक्त : आम्ही निर्व्याज भक्ती करतो.
पप्रे : पूर, प्रदूषण हे व्याजासकट मिळते ना तुम्हाला, ते याच अडाणीपणामुळे. सुधरा भक्त हो! (कोपरापासून नमस्कार करतो.)
भक्त : आशीर्वाद देतो. शेवटी नतमस्तक झालाच ना. ही आमची दैवी शक्ती.
पप्रे : (पाय खेचून जमिनीवर पाडतो.) ही आमची शक्ती. खूप झालं रे तुझं. नर्मदेतली गोटी फेकून मारली, तरी नर्मदेचा आशीर्वाद समजणार एवढा निर्लज्जपणा आहे तुमच्यात.
भक्त : (उठत) ते शाळीग्राम असतात. कोणाकडेही जात नाहीत ते.
पप्रे : (शाळीग्राम हाती घेत) आता मी तुला आशीर्वाद देतो. (फेकण्याचा आविर्भाव).
भक्त : जातो जातो. काय वेडा आहे हा.
पप्रे : पळ, निघ. नर्मदा बचाव म्हणतो, तर यांचा भलताच आव. हर हर नर्मदे! (दगड पाण्यात प्रवाहित करत)