वायफायचे ‘उडान’

Flight WiFi: निवडक विमानांमध्ये आता वायफाय इंटरनेट सेवा सुरू करण्याची घोषणा
Free in-flight internet
वायफायचे ‘उडान’file photo
Published on
Updated on

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात पावले टाकली जात असून, त्यामध्ये हवाई क्षेत्राचा प्रामुख्याने समावेश आहे. आगामी काळात भारत हा मालवाहतूक विमानांच्या उत्पादनाचे मोठे केंद्र बनणार आहे. युरोपमधील ‘एअरबस’ ही कंपनी आणि भारतातील टाटा ग्रुपने बडोदा येथे सी-295 या मध्यम आकाराच्या वाहतूक विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवाई दलासाठी या विमानांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे केवळ हवाई दलाचीच ताकद वाढणार नाही, तर भारतातील नागरी विमान वाहतूकही विकसित होणार आहे. हवाई क्षेत्रात महिलांना अधिकाधिक वाव देण्यात येत असून, भारतातील वैमानिकांमध्ये आज 15 टक्के महिला आहेत. जागतिक सरासरी केवळ 5 टक्के इतकी आहे. 2047 पर्यंत देशात साडेतीनशे ते चारशे विमानतळे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. इंडियन एअरलाइन्सने बाराशे नवीन विमानांची मागणी नोंदवली आहे. ‘उडेगा देश का आम नागरिक’ म्हणजेच ‘उडान’ ही योजना आणखी 10 वर्षे सुरू राहणार आहे. ‘उडान’मुळे हवाई क्षेत्राचे लोकशाहीकरण झाले आहे. केवळ पुण्याचाच विचार केला, तरी लोहगाव येथील नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर शनिवारी आणि रविवारी तर 200 पेक्षा जास्त विमान उड्डाणे तेथून केली जात आहेत. शिवाय पुण्यातून देशातील 35 विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. नवी मुंबईतील विमानतळही लवकरच सुरू होत आहे.

दूरवर्ती भागांना हवाई मार्गाने जोडणे तसेच छोट्या शहरांची संपर्क व्यवस्था अधिक चांगली करणे, हा उडान योजनेचा मुख्य उद्देश होता. या योजनेसाठी 116 विमानतळ आणि धावपट्ट्या निवडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 93 ठिकाणी विमान उडालीच नाहीत. शिवाय 774 हवाई मार्गांची निवड या योजनेंतर्गत करण्यात आली होती. त्यापैकी 403 मार्गांवर उड्डाणे सुरू होऊ शकली नाहीत, असे कॅगनेच म्हटले आहे; मात्र तरीही विमानात प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याचे स्वागतच केले पाहिजे. एअर इंडियाने ताफ्यातील निवडक विमानांमध्ये आता वायफाय इंटरनेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांना मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. अशाप्रकारे इन फ्लाईट वायफाय सेवा देणारी एअर इंडिया ही देशातील पहिली विमान कंपनी ठरली आहे. प्रारंभी काही निवडक विमानांमध्येच ही सोय असेल आणि त्यानंतर हळूहळू सर्व विमानांमध्ये वायफाय इंटरनेट सुरू केले जाईल. अर्थात, सध्या जागतिक स्तरावरील विमान कंपन्या प्रवाशांना मोफत इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देत आहेतच. 27 जानेवारी 2022 रोजी टाटा समूहाने अधिकृतपणे एअर इंडियाची मालकी ताब्यात घेतली तेव्हापासून एअर इंडियाला जगातील आघाडीच्या विमान कंपन्यांमध्ये आणण्याचे टाटांचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या एअर इंडियाच्या एअरबस 350, बोईंग 787-9 आणि एअरबस 321 निओ या निवडक विमानांमध्येच मोफत वायफाय सेवा मिळणार आहे. यापूर्वी एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहेच. गेल्यावर्षी एअर इंडियाने सुरू केलेल्या नवीन एअरबस 350 विमानांखेरीज बाकीची विमाने ही पूर्वीच्या ‘विस्तारा एअरलाइन्स’ची आहेत. विस्तारा ही आता एअर इंडियाचाच भाग झाली आहे. विलीनीकरणाच्या अगोदर विस्ताराच्या निवडक आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये इंटरनेट होतेच. आता प्रवाशांना त्यांच्या लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्ट फोनवर मोफत इंटरनेट वापरायचे असल्यास एअर इंडिया वायफाय नेटवर्कच्या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक असेल. तसेच एअर इंडियाच्या पोर्टलवर प्रवाशांना त्यांची माहिती भरावी लागेल. खरे तर, विमानात वाचनासाठी मासिके असतात किंवा वर्तमानपत्रेही मिळतात; पण त्याखेरीज आजकाल बहुसंख्य लोकांना विमानात नेटफ्लिक्स व अ‍ॅमेझॉनवर एखादा सिनेमा बघावासा वाटतो किंवा यूट्यूबवरील विविध व्हिडीओ पाहावेसे वाटतात. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक आणि अधिकार्‍यांच्या द़ृष्टीने वेळ ही सर्वात महत्त्वाची बाब असते.

वायफायमुळे अशा लोकांना विमानात काम करणे शक्य होणार आहे. शिक्षणासाठी विदेश प्रवास करणार्‍या अगणित विद्यार्थ्यांना या वेळेचा अभ्यासासाठी सदुपयोग करता येणे शक्य होणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात वेळेला अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच इंटरनेटविना जगणे अशक्य होऊन बसले आहे. भारतात रेल्वे स्टेशन्स व गाड्यांमधून वायफाय सेवा उपलब्ध असते. तिचा लाभही अनेकजण घेत असतात; मात्र त्यांच्याकडील डेटावरही ते इंटरनेटशी जोडलेले राहू शकतात; पण विमानात मोबाईलवरील डेटा बंद असल्याने ते शक्य नसते. अशावेळी वायफाय सुविधा ही खूपच महत्त्वाची ठरते. एअर टू ग्राऊंड म्हणजे जमिनीवरचे मोबाईल टॉवर आणि सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून हवाई प्रवासात इंटरनेटची सोय देता येते. त्यासाठी विमानात अँटेना व अन्य उपकरणे बसवावी लागतात. विमानातील अँटेना जमिनीवरून सॅटेलाईटद्वारे इंटरनेट कनेक्ट करतो. जेव्हा जमिनीवर जिथे टॉवर नाही, अशा भागातून विमान प्रवास करत असते, त्यावेळी सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी ही इंटरनेट मिळवण्यासाठी सोयीची ठरते. विमानात अँटेना बसवणे व इंटरनेट सुविधा पुरवण्याचा हा खर्च विमान कंपन्यांनाच करावा लागतो. आंतरराष्ट्रीय कंपन्या त्याकरिता प्रथम काही काळासाठी मोफत डेटा देतात आणि नंतर वेगवेगळे शुल्कही आकारतात. त्यानंतरच्या टप्प्यात डेटा पॅक खरेदी करावा लागतो. त्यामुळे भारतातही सध्या ही सुविधा मोफत असली, तरी आज ना उद्या त्यासाठी प्रवाशांना शुल्क हे द्यावे लागू शकते आणि खरे तर फुकट काही देताच कामा नये; मात्र यापुढे हवाहवाई करताना इंटरनेटमुळे विमान प्रवास एकदम हायटेक होणार आहे. हवाई प्रवास अधिक सुखद होणार आहे, ही नव्या वर्षातील आनंदाची बातमीच म्हणावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news