हवाई क्षमतेतील भरारी

देशात प्रथमच स्वदेशी खासगी कंपनी लष्करासाठी युद्ध विमाने तयार करणार
Foundation laying of ambitious project at Tata Aircraft Complex
हवाई क्षमतेतील भरारीPudhari File Photo
Published on
Updated on
सत्यजित दुर्वेकर

भारतीय लष्कराची लढाऊ आणि मालवाहू विमाने कालबाह्य झाल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे. याची किंमत हवाई दल आणि लष्करालाही चुकवावी लागली, यात शंका नाही; पण ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला पाठिंबा देऊन देशात प्रथमच स्वदेशी खासगी कंपनी लष्करासाठी युद्ध विमाने तयार करणार आहे, हे आनंददायी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी वडोदरा येथील टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्समध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली तेव्हा भारत नक्कीच एका नव्या युगात प्रवेश करत होता. विमान निर्मितीच्या क्षेत्रात पहिल्यांदाच खासगी कंपनी उतरली आहे. तीही देशाची विश्वासू कंपनी एअर इंडिया. ‘मेक इन इंडिया’चा संकल्प प्रत्यक्षात उतरताना आपण पाहत आहोत. त्याचबरोबर भारत हा जगातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र खरेदी करणार्‍या देशांपैकी एक आहे, हा शिक्काही पुसून काढण्याच्या दिशेने आपण पुढे सरसावले आहे. टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि स्पेनच्या एअरबस यांच्या संयुक्त उपक्रमात 40 सी-295 विमानांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच, स्पेन आणि भारत यांच्यात एकूण 56 विमानांसाठी करार झाला होता, त्यापैकी 16 तयार विमाने स्पेनकडून भारताला मिळणार आहेत.

सी-295 विमान सैनिक, उपकरणे आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणारे आहे. ते लहान हवाईपट्टी आणि दुर्गम भागातूनही उड्डाण करू शकते. गेल्या काही वर्षांत भारत सरकारने प्रगत आणि तांत्रिक क्षेत्रात उत्पादन वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. यामध्ये संरक्षण उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, इलेक्ट्रिक वाहने, ग्रीन हायड्रोजन आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन समाविष्ट आहे. या मोहिमेत सरकारने केवळ परकीय गुंतवणुकीला आमंत्रण दिलेले नाही, तर देशातील खासगी क्षेत्रालाही भरपूर संसाधने आणि भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या काही वर्षांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. केंद्र सरकारच्या अशा प्रयत्नांमुळे आपण संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी बनण्याच्या दिशेने जात आहोत. यामुळे देशात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. याखेरीज आपल्या परकीय चलनाची केवळ बचतच होणार नसून, ते वाढण्यास मदत होणार आहे. तसेच संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीच्या शर्यतीतही भारत आगेकूच करणार आहे. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल, हे नक्की.

भारतीय लष्करात सी-295 विमानांचा समावेश झाल्याने जुन्या रशियन विमानांचा धोका टाळता येणार आहे. सी-295 च्या निर्मिती प्रकल्पामुळे देशात 3 हजार प्रत्यक्ष आणि 15 हजार अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय वडोदरा आणि आसपासच्या भागांच्या अर्थव्यवस्थेलाही नवी चालना मिळणार आहे. त्याचबरोबर या विमानांमध्ये वापरल्या जाणार्‍या स्वदेशी सुट्या भागांपासून उत्पन्नाचे विविध स्रोतही विकसित केले जाणार आहेत. भारताच्या कठीण काळात परकीय सरकारे शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यात मदत करण्यास टाळाटाळ करत असल्याचा पूर्वीचा अनुभव आपल्या गाठीशी आहे; पण सी-295 प्रकल्पाच्या यशानंतर भारताला संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत सहभागी होता येईल. कालांतराने अशी विशेष उत्पादने तयार करण्याची संस्कृती देशात विकसित होण्याची शक्यता आहे. यामुळे देश केवळ शस्त्रास्त्र उत्पादनात स्वावलंबी होणार नाही, तर भारताच्या तिन्ही सैन्यांचे मनोबलही उंचावेल. देशासमोरील कोणत्याही संरक्षण आव्हानाला लष्कर प्रत्युत्तर देण्यास सक्षम बनेल. देशाच्या सामरिक क्षमतेच्या मूल्यमापनामध्ये त्याच्या हवाई दलाची ताकद आणि आधुनिक युद्ध विमानांची उपलब्धता महत्त्वाची ठरते. भारत या दिशेने वाटचाल करत आहे. भविष्यातील संभाव्य धोक्यांचा विचार करता ही घडामोड दूरगामी परिणामकारक ठरणार आहे. देशाची वाटचाल ही सर्वच क्षेत्रांत आत्मनिर्भर होण्याकडे सुरू असून, त्यामुळे जगभरात भारताचा दबदबा वाढत आहे. हवाई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेले बदल निश्चितच कौतुकास्पद असल्याचे म्हणायला हवे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news