शंभर वर्षांत संघ किती बदलला? भारत किती बदलेल?

सरसंघचालकांनी विजयादशमीला संबोधित केले
Foundation Day of Rashtriya Swayamsevak Sangh
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस.Pudhari File Photo
Published on
Updated on

आलोक मेहता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस विजयादशमीला असतो. दरवर्षीप्रमाणेच सरसंघचालकांनी यंदाही स्वयंसेवकांना 2025 मध्ये संघ शंभर वर्षे पूर्ण करत असल्याबद्दल आदर्श तत्त्वांचे पालन करण्याबरोबरच संघटना आणि देशाच्या दिशेचे चित्र मांडले. कोणत्याही संघटनेसाठी शताब्दी काळात होणारा बदल हा संघटना बांधणीचा आढावा घेण्याबरोबरच भविष्यातील पायाभरणीचा आराखडा तयार करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर शंभर वर्षांत संघ किती बदलला, भारत किती बदलेल, हे पाहणे लक्षवेधी ठरेल.

हिंदुत्व, समाज, राष्ट्रप्रती त्याग, आदर्श या गोष्टी जोपासत असताना स्वातंत्र्यसंग्रामानंतरचा संघर्ष, निर्बंध, तुरुंगवासाच्या यातना सहन करत स्वयंसेवकांनी सत्तेपर्यंत मारलेली मजल आणि त्यात मिळालेले यश कमी लेखता येणार नाही. संघाच्या मुशीत तयार झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत संघाला काय आणि किती मिळाले, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो. सध्याच्या राजकीय वर्तुळात आणि माध्यमातही संघ आणि भाजप नेतृत्व यांच्यातील संघर्ष आणि बदलाची चर्चा केंद्रस्थानी राहिली आहे; पण आतापर्यंतच्या राजकीय घडामोडींचा घेतलेला अनुभव आणि संघासह विविध पक्षांच्या नेत्यांशी गेल्या पन्नास वर्षांच्या पत्रकारितेच्या काळात माझा सतत असणारा संवाद पाहता म्हणू शकतो की, मतभेदांचा मुद्दा हा जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक बलराज मधोक यांच्या काळापासून राहिला आहे आणि भविष्यातही राहील; पण संघाने स्वत:च्या तत्त्वांचे पालन करणार्‍या भाजपला कमकुवत करण्याचा, धडा शिकवण्याचा, पंतप्रधानांना हटविण्याचा केलेला प्रयत्न याला विशिष्ट वर्गाचा किंवा संघटनेतील काही कनिष्ठ पातळीवरच्या नेत्यांचा भ्रम म्हणता येईल. हा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ, असेही म्हणता येईल.

योगायोग म्हणा, पण माझ्यासारख्या मोजक्याच पत्रकारांना 1972 मध्ये सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना भेटण्याची, प्रोफेसर राजेंद्र सिंह आणि के. सी. सुदर्शन यांची दीर्घ मुलाखत घेण्याची आणि आताच्या संघ आणि भाजपच्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली असेल. यामागे कारण म्हणजे मी प्रारंभीच्या काळात संघाच्या ‘हिंदुस्थान समाचार’चा पत्रकार म्हणून काम केले. त्याचे व्यवस्थापकीय संपादक बालेश्वर अग्रवाल, त्यांचे वरिष्ठ सहकारी एल. बी. लेले, रामशंकर अग्निहोत्री यांच्यासह राजकीय पत्रकारितेचे धडे शिकण्याची संधी मला 1975 पर्यंत मिळाली. विशेष म्हणजे या काळात या मंडळींनी काँग्रेसचे आघाडीचे नेते यशवंतराव चव्हाण, जगजीवन राम, विद्याचरण शुक्ल, द्वारकाप्रसाद मिश्र यांसारख्या दिग्गज नेत्यांची ओळख करून दिली. यानंतरच्या काळातदेखील इंदिरा गांधींपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांना भेटण्याची आणि त्यांना जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे सत्तरच्या दशकात मी संघाचा झेंडेवाला असताना चमनलाल यांची प्रत किंवा रजिस्टरमध्ये प्रचारकांची नावे, पत्ते, संपर्क पाहिले आहेत आणि आताच्या- सध्याच्या युगात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली एक भव्य इमारत, लाखो कार्यकर्त्यांची संगणकावर नोंदणी, प्रचारक संघाच्या कार्याची माहिती देश-विदेशात प्रकाशित होताना पाहत आहे; तेव्हा संघाला काय मिळाले, असा प्रश्न मला कसा पडू शकतो?

भारतात 2022-23 पर्यंत संघाच्या 68,651 शाखा झाल्या. पुढच्या वर्षी शताब्दी वर्ष साजरे करण्याची तयारी करणार्‍या संघाने देशातील सर्व ब्लॉकपर्यंत शाखा पोहोचविणे आणि एक लाख संख्या करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. भाजपचे सरकार असल्याने संघाला केवळ वैचारिक रूपातूनच फायदा झाला नाही, तर समाजातील त्यांच्या द़ृष्टिकोनाला मान्यता मिळाली. अयोध्येतील भव्य मंदिर निर्मिती, काश्मीरमधून कलम 370 हटविणे, आण्विक शक्ती प्राप्त करत पाकिस्तान आणि चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता विकसित करणे, आर्थिक आत्मनिर्भरतेसह हिंदू धर्म, मंदिरांचा जागतिक प्रसार, समान नागरी कायदा यांसाठी राज्यांकडून घेतला जाणारा पुढाकार यासारखे संघाने बाळगलेले ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारशिवाय शक्य झाले असते का?

दुसरीकडे उच्च पदावर असलेले संघाचे प्रमुख नेते भारतात जन्मलेल्या सुमारे 98 टक्के लोकांना भारतीय हिंदू मानण्यावर भर देतात आणि ही बाब फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्यात शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आदींचा समावेश आहे आणि मग ते कोणत्याही धर्माचे पालन करणारे असोत. सरसंघचालक राजेंद्र सिंह यांनी 4 ऑक्टोबर 1997 रोजी मला एक मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, आम्ही मानतो की, भारतात असणार्‍या एकूण मुस्लिमांपैकी केवळ दोन टक्के पूर्वज बाहेरून आले. उर्वरित पूर्वज भारतातीलच होते. तुम्ही मुस्लिम आहात, परंतु भारतीय मुस्लिम आहात, हे आम्ही सांगू इच्छित आहोत. आपल्याकडे प्रार्थनेच्या डझनभर पद्धती आहेत. तेव्हा एक तुमचीही मान्य असेल. यात आम्ही आक्षेप घेण्याचे कारण नाही; मात्र तुमची ओळख भारतीय म्हणूनच राहिली पाहिजे.

वास्तविक नरेंद्र मोदी यांच्यात संघ विचारसरणी आणि राजकीय व्यावहारिकता यांचा दुर्मीळ संगम पाहावयास मिळतो. म्हणूनच काही नेत्यांकडून एखाद्या कुटुंबात असणार्‍या मतभेदाप्रमाणे वाद आपापसात मिटवले जात असल्याचे सांगितले जाते, तेव्हा त्यात तथ्य असल्याचे निदर्शनास येते. बाहेर काहीही म्हणोत, ईशान्य भारत असो किंवा दक्षिण भारत असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या टीमने एकत्र येऊन त्यांचा प्रभाव वाढविला आहे. त्यांचे ध्येय तात्पुरता लाभ मिळवण्याऐवजी पुढील पन्नास-शंभर वर्षांत भारतात आपले विचार आणि आदर्श रुजविण्याचे आहे.

(लेखक पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ विचारवंत आहेत.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news