Dr. D.Y. Patil : 'ज्ञान‌'पीठ पाेरके

Dr D Y PATIL
Dr D Y PATILPUDHARI
Published on
Updated on

समाजात काही व्यक्ती अशा असतात की, त्यांचे मूल्यमापन केवळ त्यांनी भूषविलेल्या पदांवरून किंवा मिळविलेल्या सन्मानांवरून करता येत नाही. त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्यातून, लोकांशी असलेल्या नात्यांतून उलगडत जाते. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्याबाबत हा अलिखित तत्त्वसिद्धांत तंतोतंत लागू होतो. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे आभाळाएवढे योगदान, सामाजिक बांधिलकी, सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभव आणि माणसांना जोडून ठेवण्याची विलक्षण हातोटी यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एखाद्या व्यक्तीचे मोठेपण त्याच्या अधिकारात नसते, तर स्वभावात असते, याची प्रचिती डॉ. पाटील यांच्या जीवनप्रवासातून येते.

कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांचा आदर्श त्यांच्यापुढे होता. शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम नसून सामाजिक परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी साधन आहे. समाजातील विषमता, अज्ञान, गरिबी आणि सामाजिक अन्याय यांवर मात करण्याची खरी ताकद शिक्षणातच दडलेली आहे, हा समाजसुधारकांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी केलेले कार्य शब्दांत न मावणारे आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत गुणवत्तेला केंद्रस्थानी ठेवण्याचा त्यांचा दृष्टिकोन भारतीय शिक्षणव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरला. चार दशकांहून अधिक काळ त्यांच्याशी असणारा आमचा घरोबा पुढे नात्यांच्या स्नेहबंधामध्ये रूपांतरित झाला आणि मैत्रीच्या फुलांनी नात्यांचे उद्यान बहरले. ऐन उमेदीच्या काळापासूनचा त्यांचा जीवनप्रवास एखाद्या नदीसारखा राहिला. नदी सतत प्रवाही राहतानाच किनाऱ्यालगतच्या प्रदेशाला समृद्ध आणि संपन्न करते, तसेच डॉ. डी. वाय. पाटील यांनीही समाजातील अनेकांना आधार दिला. व्यावसायिक शिक्षण महानगरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, या ध्येयातून त्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, जैवतंत्रज्ञान, नर्सिंग, दंतचिकित्सा आणि इतर अनेक शाखांतील शैक्षणिक संस्था उभारल्या. आज त्यांच्या संस्थांमध्ये देश-विदेशातील हजारो विद्यार्थी शिकताहेत. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड आणि भारतीय संस्कृतीतील मूल्यांचे भान यांचा समन्वय साधणारे शिक्षणच सक्षम समाज आणि सक्षम राष्ट्र घडवू शकते, ही त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या जागतिक परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम बनविणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला.

देशात तब्बल ७ स्वतंत्र विद्यापीठे उभी करण्याचा अद्वितीय आणि ऐतिहासिक विक्रम त्यांच्याच नावावर आहे. नेपाळ, मॉरिशसमध्येही त्यांनी शिक्षण संस्था काढल्या. आरोग्यसेवा ही त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग राहिली. आधुनिक वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, उपेक्षित आणि गरजू घटकांना पैशांअभावी उपचाराविना राहावे लागू नये, यासाठी त्यांनी नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स सुरू केली. त्याद्वारे हजारो गोरगरिबांना मोफत किंवा अत्यल्प दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध केले. कोव्हिड असो की इतर कोणतीही आरोग्यविषयक आणीबाणी, त्यांचे आरोग्य जाळे नेहमीच सामान्य जनतेच्या मदतीसाठी अग्रेसर राहिले. राजकारणात त्यांनी दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली.

१९५७ मध्ये कोल्हापूर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून सार्वजनिक जीवनाला सुरुवात करणारे डॉ. पाटील पुढे १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. बिहारमधल्या उच्च शिक्षणव्यवस्थेला त्यांनी लावलेली शिस्त पाहून नितीशकुमारही अवाक्‌ झाले होते. त्रिपुराला एज्युकेशन हब बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राज्यपाल असताना केवळ एक रुपया वेतन स्वीकारण्याचा त्यांचा निर्णय सार्वजनिक पद हे वैयक्तिक लाभासाठी नव्हे, तर समाजहितासाठी स्वीकारले आहे, याची साक्ष देऊन गेला. नवी मुंबईत नेरूळ येथे त्यांनी उभारलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे डी. वाय. पाटील स्टेडियम हे भारतीय क्रीडाविश्वातील मानचिन्ह बनले आहे. क्रिकेट सामने असोत किंवा फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सोहळे, या भव्य स्टेडियमने जगाचे लक्ष वेधून घेतले. देशात क्रीडा संस्कृती रुजावी, यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत मराठी माणसाच्या कर्तृत्वाची साक्ष देणारी ठरली. साधेपणा आणि माणुसकी ही त्यांची ठळक गुणवैशिष्ट्ये होती. शेवटपर्यंत लोकांमध्ये राहणे, संवाद साधणे आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे अनुभव शांतपणाने ऐकणे ही जीवनसूत्रे त्यांनी कायम ठेवली. जेवणाच्या टेबलवर कोणताही भेदभाव न करता सर्वांसोबत बसणे, पाहुण्यांच्या आदरातिथ्याची काळजी घेणे, भेटायला आलेल्या व्यक्तींची विचारपूस करणे, आपल्याशी जोडलेल्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, या गोष्टी त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होत्या. त्यांनी कधीही सामान्यांशी नाळ तुटू दिली नाही. अविरत कार्यशीलता हा त्यांच्या जीवनाचा आणखी एक प्रेरणादायी पैलू. पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांची कार्यक्षमता, वेळेचे नियोजन आणि लोकांशी सातत्याने संवाद साधण्याची वृत्ती अनुकरणशील होती. शिक्षण, समाजकारण, प्रशासन, क्रीडा, उद्योग आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी नियमित संपर्क ठेवून त्यांनी स्वतःला काळानुरूप अद्ययावत ठेवले.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्याकडे असणाऱ्या दीर्घ राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवातून मिळालेली शिकवण तरुणांना खुल्या दिलाने दिली. तरुण पिढीशी विविध विषयांवर चर्चा करणे, नवीन कल्पना ऐकून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे याची त्यांना विशेष आवड होती. त्यांच्या कार्याचा गौरव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेण्यात आली. शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना १९९१ मध्ये भारत सरकारने ‌'पद्मश्री‌' सन्मानाने गौरविले. याशिवाय ब्रिटनच्या प्रतिष्ठित नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीसह अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला; मात्र कोणत्याही पुरस्कारापेक्षा शिक्षणाच्या माध्यमातून घडलेली पिढी आणि समाजात निर्माण झालेला विश्वास हीच त्यांच्या कार्याची सर्वात मोठी पावती मानावी लागेल. शेगावच्या श्री गजानन महाराजांचे ते निस्सीम भक्त होते आणि आपल्या यशाचे सारे श्रेय ते नेहमी संतकृपेला व कष्टांना देत असत. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी पाठीशी नसताना केवळ अंतःप्रेरणेच्या आणि लोककल्याणकारी भावनेच्या बळावर माणूस कशी शिखरे सर करू शकतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचा जिव्हाळा होता. संजय गांधींशी मैत्री होती; पण त्याचा राजकीय लाभ घ्यावा, हा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. त्यांनी उभी केलेली ज्ञानमंदिरे, जपलेली माणसे आणि रुजविलेली मूल्ये यातून त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news