Dr. D.Y. Patil : रोजगाराभिमुख शिक्षणाचे प्रणेते

Dr. D.Y. Patil
Dr. D.Y. Patil
Published on
Updated on

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय

कौशल्य शिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण ग्रामीण भागात पोहोचविण्याचे कार्य डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. तेच खऱ्याअर्थाने रोजगाराभिमुख शिक्षणाचे प्रणेते आहेत.

डॉ. डी. वाय. पाटील यांचे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षणाला सकारात्मक दिशा देण्यामध्ये मोठे योगदान राहिले आहे. विशेषकरून उच्च शिक्षणाचे जाळे ग्रामीण भागात पोहोचविण्याचे मुख्य कार्य त्यांनी केले आहे; परंतु उच्च शिक्षण केवळ ग्रामीण भागात पोहोचविणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर त्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती कशी होईल, याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिले होते. त्यांनी पांरपरिक शिक्षणापेक्षा नेहमी व्यावसायिक शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. यातूनच किमान कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने निर्माण होतील आणि त्यातून त्यांना रोजगार कसा मिळेल, यावर त्यांचा भर असल्यामुळे त्यांनी जे अभ्यासक्रम राज्यात सुरू केले ते सर्व अभ्यासक्रम व्यावसायिक स्वरूपाचे होते. त्यातूनच त्यांनी कृषी, आरोग्य, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी अशा व्ययसायाभिमुख अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या रोजगाराभिमुखतेला चालना देण्याचे कार्य त्यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आता सुरू झाले; परंतु डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्यकाळात जुनी शिक्षण प्रणाली होती. त्यामुळे त्या काळात केवळ पारंपरिक शिक्षणावर भर दिला जात होता. कौशल्य शिक्षण या संकल्पनाच त्याकाळात नावारूपाला आली नव्हती. अशा काळातदेखील त्यांनी व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणावर भर दिला, हेच त्यांचे प्रमुख कार्य म्हणता येईल. यातूनच त्यांचा शिक्षणातील दूरदृष्टिकोन आपल्याला दिसून येतो.

सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था राबविली जात असताना खासगी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातूनदेखील शिक्षण व्यवस्थेत योगदान दिले जाऊ शकते. यासाठी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील खासगी विद्यापीठाची सुरुवात करून त्याचा राज्यभर विस्तार केला. त्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी कौशल्य शिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी शिक्षण व्यवस्थेची सुरुवातच मुळात व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाने केली. त्यांचा भर कधीही पारंपरिक शिक्षणावर राहिला नाही. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाला एका ठरावीक चौकटीतून बाहेर काढण्याचे मुख्य कार्य त्यांनी केले.

सरकारी विद्यापीठांच्या जोडीलाच खासगी विद्यापीठांनी हातात हात घालून काम करत शिक्षण ग्रामीण भागापर्यंत तसेच तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे आणखी एक विशेष म्हणजे, स्थानिक गरजांना अनुसरून त्यांनी अभ्यासक्रमांची निर्मिती केली. यामध्ये देशासह राज्यातील कृषी, आरोग्य, उत्पादन, सेवा क्षेत्रातील गरजांचा विचार केला आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिला.

त्यांनी पंधरा ते वीस वर्षांपूर्वी ज्या कौशल्य शिक्षणाचा आणि रोजगाराभिमुखतेचा विचार केला, त्याच शिक्षणाचा समावेश आता सध्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे. विकसित भारताचे ध्येय आपल्याला गाठायचे आहे. त्यासाठी आपल्याला उत्पादन निर्मितीचे हब होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या उत्पादन क्षमतेत प्रचंड वाढ करावी लागणार आहे. ही वाढ करण्यासाठी कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची आपल्याला गरज आहे. हेच मनुष्यबळ तयार करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आली; परंतु हेच डॉ. डी. वाय. पाटील यांनी वीस वर्षांपूर्वी ओळखून शैक्षणिक कार्य केले, हाच त्यांचा उच्च शिक्षणातील द्रष्टेपणा होता, असे आपल्याला म्हणता येईल.

२१ व्या शतकाच्या गरजा... २० व्या शतकातच ओळखल्या

येत्या २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न आपण पाहत आहोत. हे स्वप्न पाहत असताना या देशाला उत्पादननिर्मितीचे केंद्र तयार करावे लागणार आहे. त्यासाठी कौशल्याभिमुख शिक्षणाची गरज ओळखून संपूर्ण राज्यात केवळ उच्च शिक्षणावर भर न देता कौशल्याभिमुख शिक्षणावर भर देण्याची गरज डॉ. डी. वाय. पाटील यांनी ओळखून शिक्षण क्षेत्रात कार्य केले. त्यामुळे २१ व्या शतकाच्या गरजा २० व्या शतकाच ओळखणारे आणि शिक्षण क्षेत्रातील दिव्यदृष्टी असलेले रोजगाराभिमुख शिक्षणाचे प्रणेते म्हणून डॉ. डी. वाय. पाटील यांच्याकडे पाहता येणार आहे.

बहुविद्याशाखीय शैक्षणिक संस्था

डॉ. डी. वाय. पाटील यांचा भर हा बहुविद्याशाखीय शैक्षणिक संस्थांवर अधिक होता. यामध्ये प्रामुख्याने मेडिसीन, अभियांत्रिकी, दंतवैद्यकशास्त्र, आर्किटेक्चर, नर्सिंग आदी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक संस्था त्यांनी काढल्या. सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याच संस्थांना प्राधान्य देण्यात आले असून त्यांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. हा आग्रह आता करण्यात येत असला, तरी तब्बल वीस वर्षांपूर्वी डॉ. डी. वाय. पाटील यांचा तो आग्रह असल्याचे दिसून येते. यातून विद्यार्थ्यांना एकाच छताखाली वेगवेगळ्या विद्याशाखांचे ज्ञान घेता यावे, हाच मुख्य उद्देश त्यामागे त्यांचा होता.

आरोग्य आणि शिक्षण यांच्या एकत्रीकरणावर भर

डॉ. डी. वाय. पाटील यांनी चार दशके त्यांनी शिक्षण क्षेत्रात घालवली. त्यामध्ये त्यांनी देशात पहिल्यांदाच शिक्षणात आरोग्याचा समावेश केला. यातून त्यांना आरोग्यसेवेतील संशोधनावर महत्त्वाचा भर दिला. त्यांनी शिक्षणाच्या जागतिकीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला. शिक्षणाच्या जागतिकीकरणाची दोन उद्दिष्टे आहेत. एकतर तुम्ही जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमाची निर्मिती करायला हवी आणि दुसरे म्हणजे परदेशी विद्यार्थ्यांना तुमच्या विद्यापीठात शिकण्यासाठी आकर्षित करायचे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करून शिक्षणाच्या जागतिकीकरणाला प्रोत्साहन देण्याचे कार्य डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यार्थी शिक्षण घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या विद्यापीठाचे आणि जगातील इतर विद्यापीठांचे मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांचा भर हा संशोधन आणि नावीन्यतेवर होता. यातूनच त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन झाल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राला शैक्षणिक हब बनविण्यात वाटा

विद्यार्थ्यांना मेडिसीन, अभियांत्रिकी, दंतवैद्यकशास्त्र, आर्किटेक्चर, नर्सिंग आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची इच्छा त्या काळात होती; परंतु सरकारी विद्यापीठे किंवा महाविद्यालयांमध्ये त्या काळात मर्यादित जागा असल्यामुळे सरकारला सर्व विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश देणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी मिळत नव्हती. अशावेळी त्यांनी खासगी संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्याचे कार्य केले. यातूनच त्यांनी देशात महाराष्ट्राला शैक्षणिक हब बनविण्यात प्रमुख वाटा उचलला आहे.

(शब्दांकन : गणेश खळदकर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news