पाटीवरची पहिली रेघ

पाटीवरची पहिली रेघ
पाटीवरची पहिली रेघ
Published on
Updated on

वीरेंद्र सोनवणे

शाळेचा पहिला दिवस हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो. त्या आठवणींपासून आजच्या बदलत्या शिक्षणव्यवस्थेपर्यंतचा प्रवासाचा वेध.

तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतो. हातात एक नवीन कोरी प्लास्टिकची पाटी, गळ्यात अडकवलेली पाण्याची बाटली, पाठीवर नव्या कोऱ्या दप्तराचे ओझे आणि डोळ्यांत न मावणारे अश्रू. आईचा हात धरून शाळेच्या गेटपाशी पोहोचलो, तेव्हा समोर एक नवीन जग उभे होते. रडणारी, एकमेकांना बिलगलेली, बावरलेली मुले तिथे होती. आईने माझा हात सोडून वर्गाच्या दारात उभे केले, तेव्हा थरकाप उडाला होता. ‘शाळेचा पहिला दिवस’ हा केवळ एका नव्या वर्गात जाण्याचा दिवस नसतो, तर तो एका बालकाचा घराच्या सुरक्षित चौकटीतून बाहेर पडून जगाच्या अथांग समुद्रात टाकलेले पहिले पाऊल असते. तो दिवस जितका भीतीचा असतो, तितकाच तो एका नव्या प्रवासाची नांदी असतो.

त्या पहिल्या दिवशी मनात जी भीती असते, ती केवळ अनोळखी जागेची नसते, तर ‘आपल्याला इथे आपले कोण मानणार’ या असुरक्षिततेची असते. घरातून मिळणारे हक्काचे प्रेम आणि शाळेत मिळणारी शिस्त यांमधील अंतर पार करताना बालमन गोंधळून जाते. सुरुवातीच्या दिवसांत पाटीवर पहिल्या उभ्या रेघोट्या ओढताना हात थरथरतात. शिक्षकांचा आवाज आणि त्यांनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे पाहून एकाचवेळी आश्चर्य आणि भीती वाटते. या भीतीचे रूपांतर हळूहळू आत्मविश्वासात करण्याचे सामर्थ्य चांगल्या शिक्षकामध्ये असते. ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ या काळातील शिक्षकांचा धाक असला, तरी त्या धाकामागे एक अनामिक मायेचा ओलावा असायचा. गुरुजींनी पाठीवर ठेवलेला हात आणि दिलेली शाबासकीची थाप, विद्यार्थ्याला जगातील सगळ्यात मोठी लढाई जिंकण्याचे बळ देऊन जायची. भीतीची जागा मग कौतुक आणि कुतूहल घेऊ लागते.

आज ‘डिजिटल शिक्षणाच्या’ युगात जगत पाटी-पेन्सिलची जागा टॅबलेट आणि स्मार्ट स्क्रीनने घेतली आहे. खडूचा सुवास आणि फळ्यावरचा खडखडाट आता इतिहासजमा होत चालला आहे. या डिजिटल क्रांतीचे जितके फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटेही आता समोर येत आहेत. माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली असली, तरी यामुळे विद्यार्थ्यांमधील ‘सहानुभूती’ आणि ‘थेट संवाद’ कमी झाला आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या काळात मुले स्क्रीनसमोर तासन्‌ ता‌स बसून राहतात, ज्यामुळे त्यांचे मैदानी खेळ सुटले आहेत आणि सामाजिकीकरण थांबले आहे.

आजचे शिक्षण हे ‘ज्ञान मिळवण्याचे’ साधन न राहता ‘स्पर्धेचे मैदान’ बनले आहे. पहिल्या दिवसापासूनच मुलांवर ‘नंबर वन’ येण्याचा, टक्केवारी वाढवण्याचा आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकून राहण्याचा प्रचंड दबाव असतो. ९९ टक्के मिळवूनही जर मुलाच्या चेहऱ्यावर आनंद नसेल आणि अपयशाची भीती असेल, तर समजून घ्या की आपली शिक्षणव्यवस्था कुठेतरी चुकते आहे. खेळण्याच्या वयात मुले कोचिंग क्लासेसच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. गुणांच्या या शर्यतीत मुलांचे बालपण कुठेतरी हरवून गेले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर विचार करण्याची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके पाठ करणे, परीक्षेत ती जशीच्या तशी उतरवणे आणि गळ्यात पदव्यांचे मेडल अडकवणे नव्हे. शिक्षण ही एक जीवन जगण्याची कला शिकवणारी निरंतर प्रक्रिया आहे. खरे शिक्षण ते आहे जे माणसाला ‘विचार करायला’ शिकवते. जे विद्यार्थ्याला समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींमधील फरक समजण्याची बुद्धी देते. केवळ गुण मिळवून रोबोसारखे काम करणारी पिढी निर्माण करण्यापेक्षा, स्वतंत्र विचार करणारी, संवेदनशील आणि नैतिक मूल्ये जपणारी पिढी निर्माण करणे हेच कोणत्याही शिक्षणव्यवस्थेचे अंतिम ध्येय असायला हवे.

शाळेच्या पहिल्या दिवशी रडणारे ते लहान मूल जेव्हा जगाच्या पाठीवर एक स्वाभिमानी, विचारी आणि चांगला माणूस म्हणून उभे राहते, तेव्हाच खऱ्याअर्थाने त्या शाळेचे, शिक्षकांचे आणि शिक्षण पद्धतीचे सार्थक होते. चला, शिक्षणाला पुन्हा एकदा केवळ गुणांच्या चौकटीतून बाहेर काढून, त्याला आनंदाचे आणि विचारांचे एक मुक्त अंगण बनवूया!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news