Vidarbha municipal elections | तिळगूळ कुणाला; पतंग कुणाचा कटणार?

Vidarbha Municipal Corporation Election
Vidarbha municipal elections | तिळगूळ कुणाला; पतंग कुणाचा कटणार?
Published on
Updated on

राजेंद्र उट्टलवार

पूर्व-पश्चिम विदर्भात प्रत्येकी दोन महापालिका निवडणुकीसाठी धूमशान सुरू आहे. मकरसंक्रांत 14 जानेवारीला आटोपली की 15 रोजी नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर मनपासाठी मतदान होणार आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका आटोपल्या. विदर्भातील 52 ठिकाणी नगराध्यक्षपदासह विजय मिळवत भाजपने आपणच महायुतीत मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसरा क्रमांक आला आणि अजित पवार यांच्या घड्याळाला जोरात टिकटिक करण्यासाठी विदर्भात अधिक जोरकसपणे संघटन मजबुतीची चावी देण्याची गरज अधोरेखित झाली. आता पूर्व-पश्चिम विदर्भात प्रत्येकी दोन महापालिका निवडणुकीसाठी धूमशान सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेच्या नागपूर महापालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे सामोरे जात आहे.

143 जागा भाजप तर केवळ 8 जागा शिंदे शिवसेना लढवत आहे. यात केवळ दोन शिवसैनिक असून, सहा उमेदवार भाजपमधूनच दिले गेल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. पूर्व विदर्भ कार्यालयासमोर उमेदवारी अर्ज जाळून त्यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार गट सर्व जागा स्वबळावर लढणार आहे. तिकीट विकण्याच्या आरोपावरून अजित पवार गटाच्या कार्यालयात तोडफोड झाली. भाजपमध्ये असंतुष्टांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरापुढे संताप व्यक्त केला. भाजपने धक्कातंत्र अवलंबत नव्या चेहर्‍यांना संधी दिली. त्यांनी 64 तर काँग्रेसने 25 माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले. भाजपने 40 नगरसेवकांना दिले तर काँग्रेसने चार नगरसेवकांना पुन्हा संधी दिली. भाजपच्या तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांना तिकीट दिले आहे. चार टर्मचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला तिकीट नाकारल्याने त्याने भाजपचा राजीनामा दिला. काँग्रेस सर्व 151 जागा लढवत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट 94 तर उबाठा शिवसेना पन्नासपेक्षा अधिक जागा लढवत आहे. जिल्हा आणि महानगर प्रमुख एकाच प्रभागात एबी फॉर्मच्या वादात गुंतले. वंचित, बसपाचेही उमेदवार रिंगणात आहेत. सर्व स्वतंत्र लढल्यास मतविभाजनात भाजपचे कमळ फुलणार हे निश्चित आहे. भाजपने 120 जागांचे लक्ष्य ठेवले असून, काँग्रेसचे मिशन 100 नगरसेवक परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदात, भाजपचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार या तीन वारांच्या वादात उमेदवार अडकले असून, खासदार प्रतिभा धानोरकर यांचीही कसोटी आहे. नाराजी दूर करण्यासाठी भाजपने केलेले डॅमेज कंट्रोल कितपत यशस्वी ठरले, हे निकालात कळेल. नव्या समीकरणाची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट 40 जागांवर स्वबळावर लढत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र मैदानात आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागांवर स्वतंत्रपणे तर जनविकास सेना पक्ष 3 जागांवर निवडणूक लढवत आहे.

मनसे 25 जागांवर स्वबळावर मैदानात आहे. शिवसेना (उबाठा) आणि वंचित यांनी परस्पर युती जाहीर केली असून, हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 33 जागांवर लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 55 जागांवर स्वबळावर लढत आहे. अकोला महापालिकेच्या 20 प्रभागांतील 80 जागांसाठी सर्वाधिक 74 जागा लढणार्‍या शिवसेनेने दंड थोपटल्याने भाजपसमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे. काही बंडखोरांची रसद, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती आशादायी आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठा, मनसे आणि प्रहार एकत्र आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र तर वंचित बहुजन आघाडीची एकला चलो भूमिका आहे.

22 प्रभाग, 87 सदस्य असलेल्या अमरावती महापालिकेत निर्णायक क्षणी भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान यांची महायुती तुटली. शिवसेना शिंदे गट 71, भाजप 67 तर युवा स्वाभिमान पक्षाने 41 उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र सर्वच 87 जागांवर लढत आहे. काँग्रेस 75 जागांवर लढत आहे. ठाकरे गटाने 45 उमेदवार जाहीर केले, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 25 उमेदवार घोषित केले. वंचित बहुजन आघाडी व युनायटेड फोरम यांनी एकत्र 55 उमेदवार दिले. बसपाने 30 उमेदवार जाहीर केले. एमआयएम 28 आणि आप 9, मुस्लिम लीग दोन तर समाजवादी पार्टी 7 जागांवर लढत असल्याने मतविभाजनात कमळ फुलण्याची, भाजपचा फायदा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news