पहिला चहा : या फटाक्यांचं काय करायचं?

पहिला चहा :  या फटाक्यांचं काय करायचं?
पहिला चहा : या फटाक्यांचं काय करायचं?
Published on: 
Updated on: 

सुशांत : प्रशांत, फटाक्यांवर बंदी आली रे... आता आपली मोठी पंचाईत झाली. आमच्या गल्लीतले दादा रात्री १२ वाजता फटाके उडवायचे. शेजारचे गणुकाका दचकून जागा व्हायचे.

प्रशांत : होय, नाहीतर काय... अर्ध्या तासाने समजायचे गल्लीत दादांचा वाढदिवस होता ते. शेजारी-पाजारी कोण आहे, ते फटाके का उडवत आहेत, हे माहीत नसायचे

सुशांत : आमचीच गोष्ट घे. आम्ही दिवाळीला रात्री १२ वाजता काय, पहाटे ३ वाजता मोठा बॉम्ब लावून शांतता भंग करायचो. लांब कशाला एखाद्याला मुलगा झाला तरी किमान हजाराची फटाक्यांची माळ लावून आनंद व्यक्त केला जायचा.

प्रशांत : शेजारी-पाजाऱ्यांना फटाक्यांच्या आवाजानंतर कळायची बातमी. ते मग ओरडून सांगायचे इतरांना... काय घडलं ते...

सुशांत : परवाची गोष्ट... वडणगेकरांच्या बेबीताईंच्या मुलाच्या मुलाला मुलगा झाला. लावली हजाराची माळ. त्या आधी एसएससीला बेबीताईंच्या घरात ७५ टक्के मार्क मिळालेले कुणाला तरी... तेव्हा तर दहा हजारांची माळ लावली होती.

प्रशांत : फटाके लावायला कुणाची परवानगी लागत नाही. पण, आता बंदी येणार. नाहीतर या आधी आजारी माणूस बघायचो नाही, दुःखी माणूस बघायचो नाही... सर्रास सगळीकडे मोठ्या आवाजात फटाके लावले जायचे.

सुशांत : निवडणुकीच्या वेळी तर विचारूच नकोस. प्रचारफेरीच्या पुढे मोटारसायकलीवर मागे बसून फटाक्यांची पेटती माळ गाडीवरून फिरवून वाजवायचो. आता मोठी पंचाईत झाली रे...

प्रशांत : फटाके वाजवण्यावर बंदी आली त्यामुळे मन मानेल तसे फटाके वाजवता येणार नाहीत.

सुशांत : आता काही लोकांना शांततेची, सुखाची झोप लागेल यात शंका नाही. आवाजाचे प्रदूषण थांबेल आणि फटाक्यांचे तुकडेही होणार नाहीत रस्ताभर...

प्रशांत : लहान मुलांनाही जपावे लागायचे फटाक्यांपासून. एकदा आमच्या भाच्याने बॉम्बमधील दारू काढली होती सगळी पेपरवर आणि त्याला उदबत्ती लावली. उडाला भडका.

सुशांत : मग?

प्रशांत : त्या दारूचा स्फोट होऊन भाच्याची बोटे जळाली. तेव्हापासून त्याने फटाक्यांचा धसका घेतला...

सुशांत : मग बंदी आले ते ठीकच झाले... पण, जास्त काळ टिकेल असे वाटत नाही...

प्रशांत : तेही आहेच!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news