

चालता चालता एक झुरळ पायाशी आले, वाट पण बदलायला तयार नाही. तेही नाही मग मी पण नाही. आंदोलनात सहभागी होणारे झुरळ असणार याची स्पष्ट जाणीव झाली. मी विचारले, ‘‘काय बाबा, कसं काय? जंतर मंतर मैदानावर जाण्याची मॉक तयारी म्हणून माझी विरोधी पार्टी म्हणून निवड केलीस की काय बाबा? पायाखाली येशील, हकनाक जाशील. त्यापेक्षा आपला रस्ता बदल. ते बरे होईल. कसे?’’
झुरळ दोन मिशा उडवत बोलला (बहुतेक)! ‘‘डियर, मी इतक्या लांबून आलो. तुझ्या पाया पडण्यासाठी नाही. मंदिरात जाऊन आलो. आमच्या भगिनी परळीच्या मंदिरात खास गोपिका म्हणून पूजनीय आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करून थेट इकडे आलो. आपल्या मुद्पाकखान्यात देवासाठी मोदक बनवलेत त्याच्या वासावर आलो.’’
‘‘वाह! मंदिरात मोदक भेटले असते की. इकडे येण्याचे कष्ट का घ्यावे आपण?’’
त्यावर झुरळ निरुत्तर झाला आणि पुढच्या लांबलचक मिशा उडवत परागंदा झाला. त्याला काही सुचले नसावे. मी चार पावले पुढे चाललो आणि तो पुन्हा दिसला. पण आता सोबत आणखीन चार झुरळं घेऊन आला. याला काय म्हणावे त्यांच्या भाषेत? बहुतेक थांब बघतोच तुला म्हणून गेला आणि येताना सोबती घेऊन आला असावा. सोबतच्या चार झुरळांना पण आत्ता मिसरूड फुटलेली. त्यामुळे तीही मिशा ताठ करून समोर ताठ उभी.
‘‘नका रे बाबा उगा पायाशी येऊ. चुकून पाय पडला तरी तुम्ही आंदोलनं करता. काय म्हणावे तुम्हास?”
एक झुरळ गटातून अलगद बाजूला गेले आणि वर्तमानपत्रांच्या रद्दीत घुसले. मी म्हटले जा बाबा. शिकण्यासाठी, शिक्षणासाठी लढणारा, आंदोलन करणारा तू झुरळांचा कार्यकर्ताच असणार. बघू रद्दीमधे तुला कोणता विषय मिळतो? थोड्या वेळाने ते रद्दीतून बाहेर आले. मी सहज रद्दी चाळून पाहिली तर याचे आणखीन दोन-चार सोबती रद्दीच्या ढिगात सापडले. कागदांचे तुकडे करून अक्षरांचे सांगाडे राहिले. आता मला कळेना, ही सेना शैक्षणिक क्षेत्रात आंदोलनकर्ते म्हणून का उतरले असावेत. जर यांना कागदात, कागदपत्रात, महत्त्वाच्या दस्तऐवजात घुसखोरी करून विल्हेवाट लावायची आहे तर आंदोलन कशाविरुद्ध करणार? मुद्दाच गैर आहे. अक्षरांशी वैर असणारे आंदोलनात उतरून करणार काय आहेत तेच कळेना. असो. हा सामाजिक कीटक धार्मिक क्षेत्रात पण असल्याने यास शिरावर घेणे गरजेचे आहे म्हणून त्याने मला छू...ss! म्हटले. पण हिंदीमध्ये ‘छू’ म्हटल्यावर वेगळा अर्थ निघतो. मी त्याच्या साम्राज्याला चिमटीत पकडून रद्दीसकट बाहेर केले...