

शाळेचा पहिला दिवस. युद्धबंदीची ट्रम्पची घोषणा. पाऊस अजून नाही... अशा बातम्यांना उधाण आलं. विद्यार्थ्यांची शालेय पुस्तके, कपडे यांची दुकाने गजबजून गेली. पावसाचा पत्ता नसल्याने यंदा रेनकोट, गम बूट, छत्रीची दुकानं या वर्दळीकडे उत्सुकतेने पाहत वेळ घालवताना दिसत होती.
‘आवंदा पावसाचं नाव न्हाई बघा’ छत्र्या विकणारा शेजारच्या शालेय साहित्य विक्रेत्याला सांगू लागला. बच्चे मंडळी पुस्तकं विक्रेत्याला घेरा घालून उभी होती.
‘काका मला हे पुस्तक नको आहे. ते दाखवा गोष्टीचं.’
दुकानदार हसत हसत ‘अरे बाळा सुट्टी संपली शाळा सुरू झाली. यादीप्रमाणे पुस्तकं देतो. ती तपासून घे नीट.’
‘हो काका.’ मुलानं थोडं नाराजीतच हो म्हटलं होतं.
गिऱ्हाईकांची गर्दी एकीकडे झुकली होती आणि दुसरीकडे हुकली होती. म्हणजे पावसाळी साहित्याच्या विक्रेत्याकडे दुष्काळ चालू होता थोडक्यात. एक बाई त्या विक्रेत्याकडे येते.
दुकानदार वैतागून बोलत, ‘काय हवे तुम्हाला? घेणार असाल तर बोला.’
‘रिकामा रुबाब नको, छत्री दाखव एखादी. कसली बसली नको.’
‘काय काकू! कसलं बसलं विकत नाही आम्ही. कसल्या रंगाची छत्री हवीय तुम्हाला?’
‘काळ्या रंगाची. रंगीबेरंगी वापरायला काय बागेत जायचंय?’
‘दाखवतो. ठीक आहे. आधी सांगायचं मग. विचारेपर्यंत काय वाट पाहता.’
‘अरे बाबा युद्धबंदीची घोषणा झाली तो व्हिडीओ पाहतेय. तू दाखव ना बाबा छत्र्या तोपर्यंत.’
‘काकू तुम्ही टाईमपास म्हणून इथे आला असला तर मी तुम्हाला छत्र्या दाखवणार नाही. उगाच उठाठेवी करायला लावता तुम्ही बायका!’
‘अरे बाबा, दाखव एखादी छत्री. घेणार आहे खरंच.’
‘मग ठीक आहे. ही घ्या.’
मोबाईल आडून डोकावत. ‘हा छान आहे असूदे. किती झाले?’
‘पाचशे!’
‘आता तर म्हणालास असलं तसलं विकत नाही म्हणून. पाचशे रुपयेची छत्री विकून तू तालेवारासारखं बोलणार होय. ठेव तुझी छत्री. (मध्येच स्वतःशी पुटपुटत) झालं बाबा एकदाचं युद्ध बंद. आता सगळं स्वस्त होणार. छत्री पण. (दुकानदाराला उद्देशून) ही तुझी छत्री कशाला घेऊ आताच? बातमी पाहिली मी. पाऊस लवकर होणार नाही यंदा. नंतरच घेते.’
‘अहो काकू, चिटिंग करताय तुम्ही. मघाशी घेणार बोलला आणि आता सटकताय.’
‘आता विचार बदलला. जबरदस्ती आहे का?’
‘ट्रम्पच्या काकू आहात तुम्ही. साध्या सुध्या नाही. त्याने पण युद्धबंदीचा करार ऐनवेळी रद्द केला नसला तर बरं. धन्य आहे तुमची काकू! (हात जोडत)