

मनोभावे घ्यावे नाव,
ट्रम्पजींचा मोठा प्रभाव!
नामस्मरण करता क्षणात,
जग येते चर्चेच्या मैदानात!
ट्रम्प नामाचा महिमा भारी,
कधी टॅरिफ, कधी टाळेबंदी सारी!
शंभर टक्के कर लावून,
मित्रांनाही टाकतात रडवून!
युद्ध पेटवावे ऐटीत,
शांतिदूत बनावे थाटात!
आधी द्यावा संघर्षाला वारा,
मग नोबेलचा करावा इशारा!
पुतीन, झेलेन्स्की, सारे हजर,
ट्रम्पजी म्हणती, मीच सूत्रधार!
जगाचा प्रश्न असो किती गंभीर,
उपाय मात्र माझाच खात्रीशीर!
कधी म्हणती डॉलर महान,
कधी जगाला देईन नवे ज्ञान!
कधी चीनला दाखवती डोळे,
अशाने फसती दोस्त भोळे!
निवडणुकीत मिळो विजय वा फटका,
ट्रम्पजींचा कायमच डंका!
हरलो तरी जिंकलो म्हणणे,
यालाच म्हणती ट्रम्पशास्त्र जाणणे!
व्हाईट हाऊसचा दरबार भारी,
ट्रम्पजींची लीला न्यारी!
ट्विट करावे मध्यरात्री,
जगाची झोप उडावी रात्री!
मित्र म्हणावे, कर लावावा,
शत्रू म्हणावे, धडा शिकवावा!
कुणी विरोधात बोलले जरा,
मग त्याच्यावर टॅरिफचा मारा!
मिडटर्मची घंटा वाजली,
सत्तेची खुर्ची डळमळली!
तरी म्हणती, मीच सिकंदर,
माझ्यापुढे जग सारे बंदर!
कधी कौतुक, कधी इशारा,
ट्रम्पजींचाच जगभर नारा!
आज नवा फतवा, उद्या नवे गाणे,
ट्रम्पलीला कुणा न कळणे!
शेवटी एकच मंत्र महान,
ट्रम्पजी म्हणजे चर्चेचे दुकान!