

ट्रम्प तात्यांच्या मनात कधी काय येईल, हे सांगता येत नाही. कधी एखाद्या देशावर १०० टक्के टॅरिफ लावतील आणि कधी आयात शुल्क माफ करतील, ते सांगता येणार नाही. आधी शुल्क लागू करण्याबाबत भारतावर त्यांचा डोळा होता. आता त्यांनी भारताला सवलत दिली आहे. त्यांच्या दयेवर हुरळून जाता कामा नये. ट्रम्प हे असे मित्र आहे की जे, घटकेत चांगले तर घटकेत बिघडलेले असतात. कारण हा बाबा सकाळी जी घोषणा करतो ती संध्याकाळपर्यंत त्यांच्या लक्षात राहत नाही. कारण संध्याकाळी ते बरोबर त्याच्या विरुद्धची घोषणा करतात. यामुळे अमेरिकेचा मूड बघून रशियासोबत वागावे लागायचे, पण आता रशियाकडून भारताला बिनधास्तपणे तेल खरेदी करता येणार आहे.
त्यांना तू कायम चांगला आहेस, असे म्हणावे लागते. नाहीतर कधी तो टॅरिफचे बंधन आपल्या गळ्याभोवती टाकेल, हे कळत नाही. म्हणूनच ट्रम्प महाशयांकडे पाहिले तर मूर्ख मित्रांपेक्षा शहाणा शत्रू परवडला असे वाटते. पाकिस्तानला ही गोष्ट चांगलीच कळली आहे. म्हणून पाकने ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी धोशा लावला होता. वास्तविक शांतता आणि पाकिस्तान यांचा काही संबंध नाही. तसा तो ट्रम्प आणि शांतता यांचाही नाही, पण दुर्दैवाने अमेरिकेला असेच मित्र मिळतात. असे म्हणजे पाकिस्तानसारखे. अमेरिका काय किंवा पाकिस्तान काय, दोन्हींच्या प्रवृत्तीत फरक पडेल असे वाटत नाही. तूर्तास तरी अमेरिकेचा मूड चांगला आहे. टॅरिफची अमेरिकेची टांगती तलवार आता लांबणीवर पडली आहे. त्यामुळे जीवात जीव आला आहे. अशा लोकांच्या बाबतीत, ‘दुर्जनस्य प्रथममः वंदे’ असे म्हणायला हवे. सध्या तरी ‘आले ट्रम्पजींच्या मना...’ त्यामुळे टॅरिफपासून मुक्ती आहे. अर्थातच, पुन्हा त्यांच्या मनात काही वेडेवाकडे येईपर्यंत.. कारण ट्रम्पजींचे मन केव्हा पालटेल, काही सांगता येत नाही...