

रामदेव : ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार... जे आहे, जे नाही ते पण सांगणार... (नामदेव समोरून पाराकडे येतो.)
नामदेव : यंदा पावसानं लय हिनवलंय! आलेला कळत नाही, जाताना सांगत नाही. कसं करायचं सांग? माझं भविष्य सांग तेवढं? बरं झालं भेटलास.
रामदेव : (हात पाहत) चित्त एकवटून आपले आपले काम करावे. मानसिक प्रसन्नता हवी. या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. व्यायाम करा.
नामदेव : शुभ बोल नाऱ्या म्हटलं, तर मांडवाला लागली आग. असं कायमचच आहे लेका तुझं. मी पावसाबद्दल बोलतोय, तू व्यायामाबद्दल.
रामदेव : तू सत्य परिस्थितीत यावं म्हणून. पाऊस पडण्याची अनेक कारणं आहेत, जे आपल्या हाती नाही. कर्म करत राहा.
नामदेव : ए बाबा. नामधारी रामदेव. नको लेक्चर तुझं. जाऊदे मला.
रामदेव : जन्म, जगणं आणि जाणं यापैकी जगणं आपल्या हाती आहे. इतक्या लवकर कुठे चाललास. अरे, काय काम होतं तुझं माझ्याकडे? तूच आलास ना हात दाखवत.
नामदेव : विसरलो आता. जाऊदे. परत येतो आणि सांगतो.
रामदेव : विसरभोळा गोकुळच आहेस. हा हा हा!!! इराण आणि अमेरिकेचे युद्ध थांबवायला तर सांगणार नाहीस ना?
नामदेव : ते तुमच्या हाती नाही आणि कोणत्याच देवाच्या हाती नाही. तुम्ही नका मोठे होऊ. मी आलोय भविष्य विचारण्यासाठी. कळत नसेल तर जातो.
रामदेव : अरे बस बस. सांगतो. नेमके कोणाचे भविष्य सांगू. देशाचं, पावसाचं की तुझं?
नामदेव : नको, राहूदे आता. माझं भविष्य तुमच्या हाती देऊन ग्रह, तारे वरून उडी मारतील तुमच्या मानगुटीवर.
रामदेव : शी शी शी. काय हा पोरकटपणा. तुझं बोलणं ऐकून नक्की येतील खाली. अरे, असा अपमान करू नये. बिघडतील ना ते!
नामदेव : तुम्ही समोर आहात, तसे बिघडलेच आहेत ते.
रामदेव : मी ग्रहांना आणि ग्रहणांना नीट करतो. बिघडवत नाही. विश्वास नसेल, तर जाऊ शकतोस. पंचावन्न रुपये हातावर ठेव आणि जा.
नामदेव : तुम्ही आमचं काय भविष्य सांगणार? घ्या; पण तुमची जागा अतिक्रमणात जाणार आहे. आता या पारावरच राहावं लागणार आहे तुम्हाला, हे सांगण्यासाठी आलो होतो. तुमचं भविष्य उजाड झालंय. भविष्य सांगताहेत. हला!