पहिला चहा | रुपाली व्हर्सेस दीपाली!

पहिला चहा | रुपाली व्हर्सेस दीपाली!
पहिला चहा | रुपाली व्हर्सेस दीपाली!
Published on: 
Updated on: 

माणसाच्या अंतर्मनात काय आहे, यापेक्षा तो बाहेर कसा दिसतो, यावरच जगाचा अधिक विश्वास असतो. आणि आता तर बाहेरचे दिसणेही आपले राहिलेले नाही! पूर्वी चोरटे इतरांची जमीन, घर, दागिने किंवा गाडी चोरायचे. आताचे चोरटे माणसाचे त्याचे नाव, चेहरा, आवाज आणि चालण्याची ढबही चोरतात. म्हणजे चोरीचा व्यवसायही डिजिटल झालाय. चोराला आता कुलूप तोडण्याची गरज नाही. एआयची दोन बटणं दाबली की एखाद्या सेलिब्रिटीला घरबसल्या नाचवता येते, त्याला गायला, भाषण करायला सांगता येते आणि कधी कधी स्वतःलाच माहीत नसलेल्या गोष्टींचे समर्थनही करतो!

रूपालीताई चाकणकर यांनाही या डिजिटल चोरीची चिंता सतावू लागली आहे. विरोधकांशी दोन हात करणारी आक्रमक शैली, माध्यमांसमोरची उपस्थिती आणि राजकीय विधानांची चर्चा यामुळे त्या कायम बातम्यांच्या केंद्रस्थानी असायच्या. मात्र भोंदूबाबा खरात प्रकरणाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का दिला. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. यातील दीपालीताईंच्या व्यक्तिरेखेवरून वादाची ठिणगी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर रूपालीताईंनी आपले नाव, फोटो, ओळख आणि वैयक्तिक शैली यासंदर्भात ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केल्याचे समजते.

चित्रपट क्षेत्रातील असो की राजकीय क्षेत्रातील; पण सेलिब्रिटींनी असे करणे म्हणजे फॅन्सवर अन्यायच नाही का? भविष्यात एखाद्या सेलिब्रिटी अभिनेत्रीच्या साडीच्या पदरालाही कॉपीराईट आहे की काय, असा प्रश्न पडेल. त्यांच्या हातवाऱ्यांची नक्कल केली तर हातावर दावा येणार का? त्यांच्या आवाजात भाषण केले तर माईक जप्त होणार का? आणि त्यांच्या राजकीय शैलीत टीका केली तर विरोधकांनी आधी परवानगी घ्यायची का? असेही प्रश्न कार्यकर्त्यांना पडले आहेत.

राजकारणात विरोधकांनी नक्कल करणे जुनेच; पण आता एआयने ती कला शास्त्रशुद्ध केली आहे. अर्थात व्यक्तिमत्त्वाचे संरक्षण व्हायलाच हवे. पण सार्वजनिक जीवनात असणाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व हे जनतेच्या चर्चेचाही विषय असते. उद्या नेत्यांनी स्वतःच्या चेहऱ्याची, आवाजाची, शैलीची आणि टीकेचीही ट्रेडमार्क नोंदणी केली, तर लोकशाहीत उरेल तरी काय? फक्त टाळ्या वाजवण्याचा परवाना!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.