

पाऊस : नमस्कार खड्डेराव! वर्षभराची सुट्टी संपली ना?
खड्डा : अगदी! तुझ्याच पहिल्या सरीची वाट पाहात होतो. तू आलास की माझी बदली थेट रस्त्याच्या मध्यभागी होते.
पाऊस : पण यंदा तर महापालिकेने मोठ्या थाटात घोषणा केली होती - ‘खड्डेमुक्त रस्ते!’
खड्डा : (हसत) ती घोषणा माझ्यासाठी स्वागताची घंटाच असते. घोषणा जितकी मोठी, तितका माझा आत्मविश्वास वाढतो.
महापालिका : दर्जेदार डांबरीकरण केलं.
पाऊस : मग दोन सरींनीच ते कुठे गेलं?
खड्डा : अरे, मी तर अजून पूर्ण उघडलोही नाही. पुढच्या आठवड्यात माझे चुलत भाऊ, मावसभाऊ आणि शेजारचे खड्डेही येणार आहेत.
दुचाकी : तुम्हाला विनोद सुचतोय, पण माझा टायर फुटला, सस्पेन्शन गेलं आणि सर्व्हिसिंगचं बिलही आलंय.
खड्डा : त्यात माझा काय दोष? मी तर शांतपणे रस्त्यावर पडून असतो. तुम्हीच माझ्याकडे न पाहता वेगाने येता!
दुचाकी : काल तर तुझ्यात पाणी भरलं होतं. खड्डा आहे की तलाव, हेच कळलं नाही.
खड्डा : पावसाळ्यात मलाही थोडं सजायला आवडतं. मग पाण्याचा मेकअप चढवतो...
विरोधक : हे सगळं निकृष्ट कामाचं फलित..
सत्ताधारी : नाही, हा विक्रमी पाऊस आहे. एवढ्या पावसासमोर काही चालत नाही हो...
पाऊस : अरे बाबा, मला बदनाम करू नका. मी तर हजारो वर्षांपासून पडतोय. पण रस्ते एवढ्या लवकर का विरघळतात, हे मला अजूनही समजलेलं नाही.
महापालिका : लवकरच सर्व खड्डे मुजवू.
खड्डा : हो... फोटो काढेपर्यंत!
पत्रकार : सर, खड्डे कधी संपणार?
अधिकारी : पाऊस थांबल्यावर.
पाऊस : आणि मी थांबलो की म्हणणार, निधी आला की काम सुरू करू!
दुचाकी : पण, नागरिकांनी नेमकं काय करायचं?
खड्डा : गाडी हळू चालवा, हॉर्न कमी वाजवा आणि मला चुकवण्याचा प्रयत्न करा.
दुचाकी : म्हणजे तुला चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात पडतो! हे टीमवर्क चांगलं आहे तुमचं...
पाऊस : लोक माझ्यावर कविता लिहायचे, आता माझं नाव घेतलं की खड्डे आठवतात.
खड्डा : आणि माझं नाव घेतलं की कंत्राटदार, डांबर आणि चौकशी समिती आठवते!
दुचाकी : एवढं सगळं झाल्यावर तरी पुढच्या वर्षी काही बदलेल का?
पाऊस आणि खड्डा (एकसुरात) : आशा ठेवायला हरकत नाही... पण आम्ही पुढच्या पावसाळ्यात पुन्हा भेटूच!