

पुजारी : हा घ्या प्रसाद. आपली मनोकामना पुरी होऊ दे!
भक्त : पण, हे तुम्ही ठामपणे सांगू शकता का? तरच, प्रसाद ग्रहन करेन.
पुजारी : अन्न हे पूर्णब्रह्म! आण इकडे तो. नको घेऊ.
भक्त : अहो, असे काय करता? मी विचारतो फक्त. (प्रसादाचा हात बाजूला घेत.)
पुजारी : मग विचारता कसे? अहो, पुण्य कमावले की, प्रसादाचे फळ आपोआप मिळते.
भक्त : पुण्य आणि त्यातून मिळालेले फळ हाच प्रसाद असेल, तर मग या प्रसादाचे काय करू?
पुजारी : अरे बाप्पा रे! आता काय करू? इतका पुण्यवान मनुष्य माझ्या समोर उभा आहे. पाय धरू का तुमचे? (उपहासाने पायाशी वाकत)
भक्त : अहो, कशाला कशाला? मी आहे पुण्यवान; पण आपल्यासारख्या पुजनीय व्यक्तीने अशा उठाठेवी करू नयेत.
पुजारी : ओ, प्रसाद घ्या आणि जा ना! मला खूप कामं आहेत.
भक्त : प्रसाद तर वाटत आहात. पूजा तर झाली आहे. आता पोटभरीचं काम शिल्लक असेल?
पुजारी : हे बघा, पुजारी फक्त पोट भरण्यासाठी देवांची सेवा नाही करत. आपल्यासारखे विद्वान इथे येतात, धड नास्तिक नाही आणि धड आस्तिक नाही अशी गत तुमची. भिडावे लागते कधी कधी आपल्यासारख्यांशी.
भक्त : मंदिरात आहोत आपण. भक्तांच्या प्रश्नांचे उत्तर देता यावे आपणास. एवढीच अपेक्षा होती.
पुजारी : इथे कौन बनेगा करोडपती चालू आहे का? मी कशाला उत्तरं देऊ तुमच्या प्रश्नांची?
भक्त : द्या अगर नाही द्या. प्रश्न तर तसाच राहिला.
पुजारी : हे बघा, पुण्यवान मनुष्याला फळाची अपेक्षा नसते. तो कर्म करत राहतो. तुम्हीही आपले कर्म करायला निघून जा. प्रसादाचा आणि तुमच्या मनोकामनेचा काही संबंध नाही. ठेवा तिथे देवासमोर.
भक्त : अहो पुजारी महाराज, या प्रसादात मेलेली माशी आहे. माझी नाही, तुमची पण मनोकामना निष्फळ जाईल. हा बघा घेतला फोटो. (मोबाईलचा कॅमेरा ऑन करत.)
पुजारी : (घाबरत) असं कसं? ओ त्यात माझा नाही काही संबंध. चुकून झालं. (पाय पकडतो.)
भक्त : ते आता एफडीए काय ते ठरवेल. अन्न हे पूर्णब्रह्म! भक्तांच्या आयुष्याशी नका खेळू. आपली मनोकामना एफडीएवर निर्भर! तथास्तु!