

(स्थळ : पावसाचे ठिकाण. वेळ : घड्याळाला सुचलेली. एक उदयोन्मुख युवा नेता घड्याळात पाहत भाऊसाहेबांच्या बंगल्यात प्रवेशतो. सगळीकडे अंधार)
युवा नेता : येऊ का?
भाऊसाहेब : यावे यावे. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ!
युवा नेता : आपला बंगला छान आहे. सगळीकडे पावसाचा वर्षाव होतोय असं वाटतं बंगल्याचं नाव वाचून.
भाऊसाहेब : धन्यवाद! कसे येणे केले?
युवा नेता : काल रात्री आमचे दोन पक्षकर्ते आपणास भेटून गेल्याचे समजले. म्हणून आलो.
भाऊसाहेब : ओह! अच्छा! ते होय. ते सहजच आले होते. तू बस ना. चहा घेणार का?
युवा नेता : रात्र झालीय. या वेळी चहा विचारताय म्हणजे अगदीच औपचारिकता. अहो ज्यूस विचारायचा.
भाऊसाहेब : अरे हा. आपल्याकडे पाहुण्यांचे अगत्य चहाने होतं म्हणून सवयीने विचारले. कोणता ज्यूस घेणार?
युवा नेता : फुलापासून ज्यूस बनतो का?
भाऊसाहेब : ज्यूस हा फळांचाच असतो.
युवा नेता : हल्ली फळांची अपेक्षा करण्यापेक्षा ज्यूस बरा. नाही का? ज्यूस चालेल. बरं! काल ते दोघे येऊन गेले त्यांच्याशी काय बोलणे झाले का आपले?
भाऊसाहेब : इतर गोष्टींवर चर्चा करत होते. पक्षातल्या नाही. आम्ही कोणाला दुखावत नाही.
युवा नेता : दुसरे एकजण होते. ते का आले असावेत. योगायोग असेल नाही का?
भाऊसाहेब : घड्याळं दोन असली तरी वेळ एकच दाखवतात. योगायोग असावा.
युवा नेता : सॉरी! ते घड्याळ कोणाच्या मनगटावर आहे, यावर निर्धारित आहे सध्याच्या घडीला.
भाऊसाहेब : बाळा, अजून आमच्यासाठी तू लहानच आहेस. समजून घे.
युवा नेता : हेच खटकते आम्हाला. आम्हाला कोणीच सिरीयसली घेत नाही.
भाऊसाहेब : तुमच्या पक्षातल्या लोकांनी तुम्हाला सिरीयसली घेतलंच पाहिजे.
युवा नेता : जाऊदे. मी आपणास आमच्या मातोश्रींच्या वतीने सूचना देतो आम्हाला अशा बैठकींची पूर्व सूचना देण्यात यावी. कारण, हल्ली घड्याळात कधी कधी तास काटा (आमचेच लोक या अर्थी) एनडीएकडे झुकताना दिसतो असे स्वप्नात आले आमच्या.
भाऊसाहेब : भलतच स्वप्न आहे हे. आम्हालाही तसंच स्वप्न पडलं असे समजावे. निश्चिंत होऊन घरी जा. हा हा हा...
युवा नेता : येतो मी. पुन्हा भेटू.