पहिला चहा | गुप्त बैठक!

पहिला चहा | गुप्त बैठक!
पहिला चहा | गुप्त बैठक!
Published on
Updated on

(वेळ - रात्रीची. स्थळ - वर्षा बंगला. हुडी घातलेली व्यक्ती गेटमधून आत येते)

सुरक्षा रक्षक : कोण?

हुडीवाला : मीच...

रक्षक : मीच म्हणजे?

हुडीवाला : आवाज ओळखा...

रक्षक : जयंत पाटील साहेब?

जयंतराव : श्श... हळू बोला! ब्रेकिंग न्यूज होईल.

देवाभाऊ : या... या... हुडी कशाला?

राव : काय करणार? वहिनींनी एकदा सांगितलं होतं ना... तुम्ही हुडी घालून रात्री-अपरात्री बाहेर पडता. म्हटलं, आज त्यांच्या घरात आलोय तर ड्रेसकोड पाळू!

भाऊ : म्हणजे आज हुडी क्लबची बैठक?

राव : हो. फरक एवढाच की तुम्ही हुडी घालून बाहेर जाता... मी हुडी घालून आत आलोय!

भाऊ : बरं... चहा घेणार?

राव : चहा चालेल...

भाऊ : बाहेर चर्चा सुरू झालीय राष्ट्रवादी एनडीएची...

राव : महाराष्ट्रात अफवा वेगाने धावतात. मी अजून खुर्चीवर बसलो नाही, तोवर मला मंत्रिपद मिळालंय!

भाऊ : तुमचे नेते काय म्हणतील?

राव : ते नेहमीप्रमाणे म्हणतील - तुम्हीच ठरवा!

भाऊ : पत्रकार विचारतील, काय शिजलं?

राव : सांगा... फक्त चहा.

भाऊ : ते म्हणतील, मग दोन तास काय केलं?

राव : चहात साखर किती घालायची, यावर एकमत होत नव्हतं! (दोघे हसतात.)

भाऊ : एनडीएबद्दल काही विचारलं तर...

राव : एनडीए नाही एचडीए.

भाऊ : एचडीए?

राव : हुडी डेव्हलपमेंट अलायन्स!

भाऊ : बरं, बाहेर जाऊया?

राव : थांबा... हुडी नीट करतो. ओळख पटली तर पुन्हा एक्झिट पोल सुरू होतील! आलो होतो तेव्हा कुणी पाहिलं नाही ना?

भाऊ : नाही.

राव : मग भेट झाल्याचं कुणाला कसं कळणार?

(इतक्यात दोघांच्या मोबाईलवर एकाच वेळी नोटिफकेशन येतं.)

ब्रेकिंग न्यूज : वर्षा बंगल्यावर गुप्त राजकीय बैठक! (दोघे एकमेकांकडे पाहतात.)

भाऊ : आपण अजून बाहेरही पडलो नाही...

राव : महाराष्ट्रात बातमी आधी येते... घटना नंतर घडते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news