

माननीय आयुक्त साहेब, मी पत्र लिहिणार नव्हतो; पण काय कोणास ठाऊक बॉम्ब पडेल या धमकीने तो पडायच्या आधी पत्र लिहावे म्हटले. एकतरी पुरावा हवा नाहीतर धमक्या देणाऱ्यांशी दुरावा हवा. मग, ठरवले पुराव्यासाठीच पत्र लिहावे.
आम्हीही दोन हात केल्याशिवाय गप्प बसत नाही. आमच्याशी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न होतोय. नाव-गाव पुसू नका. ते आमच्याच नावाचा बोलबाला करतील. तो मी नाही. सगळे पुरावे फसले, तर मी आणि माझे पत्र शाबूत राहावे एवढी इच्छा आहे. पक्ष तर धुळीस मिळाला आहे. या पत्राने धूळ खाण्याआधी ते त्वरित उघडावे आणि वाचावे तसेच आम्हास वाचवावे, ही अपेक्षा करतो. आमच्या फुटलेल्या खासदाराने आम्हास बॉम्बने उडविण्याची धमकी दिलेली आहे. हाच बॉम्ब आहे. पत्रकारांशी नडतो, आमच्याशी नडण्याशिवाय पर्याय नाही म्हणा! बरं ते जाऊ दे. बॉम्ब यांच्या घरी कसे आले, याची आधी चौकशी व्हावी. ही भाकितं का केली, यावर वेगळा गुन्हा दाखल व्हावा. कोणाआडून केली यावर एक गुन्हा दाखल व्हावा. बॉम्बधारक म्हणून वेगळा आणखी एक गुन्हा दाखल व्हावा. हे आमचे विनंतीवजा पत्र आहे, याची प्रथम नोंद ठेवावी. या निव्वळ धमक्या नसून धमकीसत्र चालविणारे नावबंधू अजून काय दिवे लावून आलेत तेही बघावे. एटीएसने चौकशी करावी. हा बॉम्बपेक्षा भयंकर शिवीगाळ करतो. तो वेगळा गुन्हा दाखल करावा आणि पहिला अटक करावी.
- आपला संजय