

माधव : तुला गोडाचं आणायला सांगितलं होतं ते आणले का आदर्श? मघापासून तू टीव्ही पाहण्यात गुंग. गुंगी येऊन पडलास की काय?
आदर्श : येस डॅड. जातो; पण का आणू मी ते? घरी पाहुणे येणार का?
माधव : पाहुणे फोटोत लपलेत. जा. मला वाटलं आतापर्यंत आणला असशील.
आदर्श : हा हा... काय विनोद केलात. फोटोतले पाहुणे कोण?
माधव : तो पूज्य पिताश्रींचा फोटो नीट स्वच्छ कर भिंतीवरचा. पितृपक्ष चालू झाला. नाही तर आमच्या मातोश्री रागावतील. तिने मला सांगितले होते काल गोडाचे आणायला. विसरलोच.
आदर्श : डोन्ट वरी डॅड. जातो.
माधव : तू जा लवकर. हरी अप. आजी ओरडायच्या आत हल.
आदर्श : हो. आता जातो आणि येतो. बाय द वे! आजोबा तिखट खायचे, तिखट बोलायचे, हे माहीत आहे. मग, ते गेल्यानंतर गोड का बरं ठेवायचं त्यांच्यासाठी?
माधव : अरे, ठेवायचं असतं नैवेद्यात. कोण सांगणार आजीला हे?
आदर्श : ते खाणारे पदार्थ ठेवू ना? चिकन राईस, मटण भाकरी वगैरे.
माधव: नाही. तुझीच शांती घातली पाहिजे आता. अशाने कोप ओढवेल आजीचा आपल्यावर. काहीही बरळू नको. पटकन जा मार्केटमध्ये आणि सीताफळ बासुंदी घेऊन ये. जा!
आदर्श : जातो. मलाच भिडलं पाहिजे समाजाशी. तुम्ही बसा घरी. हां?
माधव : आता भिडायला कोणी सांगितलं? मार्केटमध्ये तर जायचंय.
आजी : गेला की नाही तो? आजोबा स्वप्नात येतील आणि ओरडतील. जा पटकन.
आदर्श : (स्वगत) वाह! मी कॉलेजात जातो हे या धमकीमुळे विसरलो. आजी... अगं कालच येऊन गेले ते स्वप्नात माझ्या.
आजी : काय म्हणाले? सांग पटकन.
आदर्श : तू गोडाचं स्वतः घेऊन येशील, तर खाईन बोलले. नाही तर मला नॉनव्हेज चालेल. (डोळे मिचकावत)
माधव : हो? असं म्हणाले का?
आजी : मेल्यानो, काही कामं करायला नकोत. मीच जाते बाजारात. आण इकडे ती पिशवी. हँ... काही कामाची नाहीत मेली. सून आत पंचपक्कवान बनवतेय. गोडाचा पत्ता नाही त्यात. तिखट आवडतं म्हणून नैवेद्यावर गोड नको? आयुष्य गेलं तिखट खाऊन, गोड फोटोत गेल्यावर खायचं म्हणून शिल्लक ठेवलं. पितृ देवो भव! (रागाने फोटोकडे पाहत हात जोडते)
माधव : नशीब, ते फोटोत आहेत. नाही तर या कृत्यावर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ चालू केली असती. हे हे हे...
आदर्श : बाबा, गुड जोक. आजी चिडायच्या आत इथून सटकू, चला... (निघून जातात.)