

रामराव : गोविंदराव, काय म्हणता, दिवाळी झाली एकदाची!
गोविंदराव : होय रामराव. दिवाळी झाली की मिसळीला खूप डिमांड येतो नाही?
रामराव : मिसळीचा शोध लावलेल्यांनी दिवाळीच्या फराळाचा फार मोठा विचार केलेला दिसतो.
गोविंदराव : फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यावर... किंवा फराळाचे पदार्थ संपेनासे की, त्याचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाल्यावर मिसळीचा उदय झाला असावा....
रामराव : मिसळीचं नाव काढलं आणि तोंडाला पानी सुटलं... चव अशी जीभेवर रेंगाळू लागली आहे....
गोविंदराव : मिसळीसाठी फार काही लागत नाही हो... मोड आलेल्या मटकीची उसळ आणि रस्सा घ्यायचा आणि त्यावर कट. त्यामध्ये फरसाण, शेव, चिवडा... हवं तरं उरलेल्या फराळातील मसालेदार पदार्थ त्यात घालू शकतो की... ही मसालेदार मिसळ लाजवाब लागते.
रामराव : मिसळीचाही आपापल्या विभागानुसार वेगळा तोरा आहे. कोल्हापुरी, पुणेरी, नाशिकची....
गोविंदराव : होय, खाणारा पण खूश आणि वाढणारा पण खूश..
रामराव : तोंडी लावायला ब्रेड असतोच. फक्त तो ताजा असावा... म्हणजे मिसळीचा फडशाच पडतो...
गोविंदराव : दिवाळीचे पदार्थ संपेपर्यंत घरोघरी अशी मिसळ नांदत असते...
रामराव : (तोंडचे पाणी गिळत) होय...
गोविंदराव : त्यातून एक होते. फराळाचे शिल्लक पदार्थही संपतात आणि मिसळ पार्टीला बोलावलेला मित्रही खूश होतो.
रामराव : त्यानंतर मग पुढील वर्षी दिवाळीनंतर हा पदार्थ पुन्हा घरोघरी उदयास येतो. एकंदरीत दरवर्षी दिवाळीत मिसळीचा पुनर्जन्म होतो. काही जण म्हणतात मिसळीसाठीच दिवाळीचा जन्म होतो.
गोविंदराव : दिवाळीच्या दिवसात जो मिसळ खातो, तो खरा भाग्यवान.
रामराव : आपल्यासारखाच!
गोविंदराव : रामराव, दिवाळीत फराळाचे पदार्थ संपवण्यासाठी मिसळ केली जाते आणि मिसळ खाऊन झाल्यावर पुन्हा फराळ खाण्याची इच्छा होते!
रामराव : बरोबर! दिवाळीचा फराळ आणि मिसळीचं नातं राजकारणासारखं आहे. एक संपवायला गेलं की, दुसरं सुरू होतं!
गोविंदराव : (हसत) दोन्हींचा तिखटपणा मात्र वर्षानुवर्षे कमी होत नाही!
रामराव : फरक एवढाच की, राजकारणात आश्वासनांचा फडशा पडतो आणि मिसळीत फरसाणाचा! (दोघेही खळखळून हसतात.)