

काही असेच सोपे मिमिक्री आर्टिस्ट आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्राकृतिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचे भलतेच स्वाभाविक गुण त्यातून मुक्त करतात. ते मिमिक्रीसाठी वरदान ठरत नाही, तर मिम्सला जागा मिळवून देते. बाप्पा, काय त्या मिम्स... हसून पोट दुखते बुवा. मिम्स आणि मिमिक्री या दोन सख्या बहिणी आहेत, म्हटलं तरी कोणी वावगं समजू नये. मिम्स एका बाजूला मीडियावर व्याप्ती वाढवत आहे, तर मिमिक्री इतकी सक्रिय नसल्याने क्राय करतेय की काय असंच एकूण वाटतं. एकेक दयनीय, निंददनीय मिमिक्री! कोणी उल्हासित आणि पुलकित होत येतो, कसंही ओढून ताणून मिमिक्री करतो आणि ती मिमिक्राय होते. या मिमिक्रीच्या नादी लागून कदाचित लिव्हर खराब होईल इतपत हे कुपोषित विनोदी बुद्धीचे आर्टिस्ट मिमिक्रीची नशा करून येतात बुवा. बघूया या दोन बहिणींचं काय मत आहे आपापसात!
मिमिक्री : हे मिम्स, हाय. आज काय मिम्स पाडलेस बाई सोशीयल मीडियावर?
मिम्स : जराही उसंत नाही. सगळ्या पक्षांनी विरोधातल्यांचे मिम्स केलेत. मलाच एकेकदा हसू येतं गं.
मिमिक्री : हस हस. इकडे मिमिक्रीवर कोणी हसणारा नाही उरला. तेवढी एनर्जी नाही राहिली. जॉन नाही मिमिक्रीमध्ये.
मिम्स : जान नाही राहिली असं म्हण ना! जॉन काय? असे वेडेवाकडे पंच कुठेही मारता. मग, फसणारच सगळं.
मिमिक्री : तेच ते. काही सूचेना मला. तुझं आपलं बरं आहे. कसेही कितीही पंच टाकता येतात गं, रिअल इमेज ॲनिमेटेड करून. माझं काय? दुसऱ्यांचे हावभाव स्वतःच्या चेहऱ्यावर फिट करावे लागतात.
मिम्स : नॉट वर्किंग. हे चालत नाही आता. तू अपडेट हो. राजकारणी लोकांवर टीका करण्याचा अधिकार माझा आहे. त्यांनाही त्यांचे कार्टून पाहायला आनंद होतो. इथे त्यांची मिमिक्री करत स्वतः किती कार्टून आहेस ते दिसून येतं. त्यामुळं ना, आता थोडी थांब गं बाई!
मिमिक्री : मग, मी काय करू? यापुढे तर सगळंच अवघड होईल. मी कुठे जाऊ मिमिक्री सोडून?
मिम्स : अगदी पूर्वीचे मिमिक्री आर्टिस्ट चेहऱ्याला दुसऱ्या चेहऱ्यात म्हणजे मास्कमध्ये लपवायचे. तसं आता तुझी मिमिक्री मास्कमध्ये लपव बाई आणि मग कर मिमिक्री.
मिमिक्री : मग, माझी ओळख काय उरणार?
मिम्स : ती आता पुन्हा निर्माण करावी लागेल. तूर्तास तू जी पुलकित होऊन मिमिक्री केलीस त्यावर विराम दे. नाही तर लोक प्रत्येक मिमिक्रीवर हसायचं सोडून बहिष्कार टाकतील. मिमिक्री एक वेगळं जग आहे. ते ओळख.
मिमिक्री : होय. खरंय. लेट मी ट्राय. तोपर्यंत तू हसवत राहा. मी जॉनी नावाच्या ट्रेनरकडून ट्रेनिंग घेऊन येते.