

महाराज : प्रधानजी, राज्यात काय विशेष?
प्रधान : महाराज जंतर-मंतरवर पोरांनी राजधानी हलवून टाकली.
महाराज : पोरांनी?
प्रधान : ही जेन झी आहे महाराज. यांना हातात दगड घेण्यापेक्षा यांच्या हातात डेटा असतो आणि डोक्यात भन्नाट आयडिया असतात.
महाराज : मग, पोलिसांनी काय केलं?
प्रधान : नेहमीचं. बॅरिकेडस् लावले; पण जिंकली पोरंच...
महाराज : म्हणजे?
प्रधान : पोरांच्या एका रीलने जे केलं, ते शंभर सभांनी केलं नसतं. एका मीमने जे टोचलं, ते दहा भाषणांनीही जमलं नसतं. खुर्ची डगमगली... हॅशटॅग ट्रेंड झाला... बाकी इतिहास.
महाराज : म्हणजे, आजकाल सरकारी सूत्रे कमेंट सेक्शनमध्ये जास्त अडचणीत येताहेत की काय?
प्रधान : अगदी तसंच, महाराज!
महाराज : मग, आपणही राज्यात काहीतरी करायला हवं.
प्रधान : म्हणूनच मसुदा तयार आहे.
महाराज : कसला?
प्रधान: 'लाडकी जेन झी' योजना.
महाराज : काय आहे त्यात?
प्रधान : आंदोलन करू नका, कंटेंट बनवा. राग असेल तर रील करा. प्रश्न असतील, तर पॉडकास्ट करा आणि टीका करायची असेल तर... कृपया सभ्य मीम वापरा.
महाराज : अनुदान?
प्रधान : दर महिन्याला ठरावीक व्हायरल व्ह्यूज पूर्ण केले की 'सर्जनशील नागरिक भत्ता' देता येईल. उत्कृष्ट मीमसाठी विशेष प्रोत्साहन द्यायचे. कमी टीका केली, तर लॉयल्टी बोनस!
महाराज : आणि जास्त टीका केली तर?
प्रधान : मग, त्यांनाच योजना समजावण्यासाठी समिती नेमायची...
महाराज : हुशार आहात! म्हणजे प्रश्न सुटणार नाहीत.
प्रधान : ...पण त्यावरचा कंटेंट नक्की वाढेल.
महाराज : प्रधानजी, ही पिढी नोटिफिकेशन, ट्रेंड काढते... आणि झोप उडवते.
प्रधान : म्हणूनच महाराज, काळाची गरज ओळखून 'लाडकी जेन झी' योजना आणावी पुढचं आंदोलन सुरू होण्याआधी...