पहिला चहा | कोयत्याचे माहेरघर!

पहिला चहा  | कोयत्याचे माहेरघर!
पहिला चहा | कोयत्याचे माहेरघर!
Published on: 
Updated on: 

वामनराव : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आमच्या प्रिय शहराला आजकाल नवीन ओळख प्राप्त झाली आहे.

गोविंदराव : हो ना! आमच्या शहराची ओळख पार बदलून गेली आहे. आमच्या शहराला विद्येचे माहेरघर कसे म्हणावे? याची ओळख तर 'कोयत्याचे माहेरघर' अशी झाली आहे.

वामनराव : इतके कोयते कुठून आले गोविंदराव हेच कळत नाही. बहुतेक ही मंडळी साऊथचे सिनेमे पाहत असावीत.

गोविंदराव : नाही तर काय... जरा काय झालं की, पटकन कोयते काढतात. अगदी कोर्टाच्या आवारातसुद्धा कोयते काढतात आणि समोरच्याला अर्धमेला करून टाकतात.

वामनराव : होय. त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. कोयत्याच्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे. झटकन कोयता काढतात आणि पटकन न्याय देऊन मोकळे होतात.

गोविंदराव : जीवावर उदार होऊन ही कोयतेमंडळी आपले काम करत असतात.

वामनराव : होय. त्यांना कोयते गँग संबोधले जाते. त्यांच्याकडे मोटारसायकली असतात. एखाद्याचा हात-पाय तोडून मोटारसायकलीवरून फरार होतात. आणि कारणे तरी काय साधी असतात... एखाद्याने आमच्या जागेत पार्किंग केले किंवा आमच्याकडे रागाने बघतो म्हटल्यावर काढ कोयता... कर कलम... असा त्यांचा न्याय असतो.

गोविंदराव : पोलिस तरी काय करतील बिचारे राजे! कोयते गँगला घाबरून तेच आपल्या जीवाला जपत नसतील कशावरून...

वामनराव : पोलिसांचं पुरे..

गोविंदराव : का? काय झालं?

वामनराव : परवा भाचा स्टँडवर आला होता. पोलिसांनी त्याला पकडले होते.

गोविंदराव : का?

वामनराव : त्याच्या पिशवीत कोयता सापडला होता. नारळ फोडण्यासाठी त्याने गावाहून आणला होता.

गोविंदराव : एकंदरीत कोयत्यामुळे वाईट अवस्था झाली आहे.

वामनराव : खरंय! आता पुण्यात माणसाची ओळख त्याच्या शिक्षणावरून नाही, तर त्याच्या हातात कोयता आहे की नाही, यावरून तर ठरणार नाही ना..? विद्येच्या माहेरघरात पुस्तक घेऊन फिरणारा संशयित आणि कोयता घेऊन फिरणारा भाई झाला आहे. आता बहुतेक पुण्याची नवी पदवीच द्यावी लागेल... ‘बी.ए. नव्हे, तर बी.के. म्हणजे बॅचलर ऑफ कोयता!’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.