

जॉन : ओ गॉड. सेव्ह मी.
शाम : का रं बाला. काय झालं?
जॉन : मला नारळाच्या झाडावर चढायचंय. प्लीज हेल्प.
शाम : काय काम हाय तीकरं?
जॉन : स्वावलंबन. नारळ हवे आहेत मला. बाकी काही नाही.
शाम : मॅड झालास का? ते तुझं काम नाही.
जॉन : मग कोणाचं? आपण आपलं काम करावं.
शाम : मग कर. तुझा तूच वरती चढ की वसाड्या.
जॉन : मी बघतो काय ते. तू जा. माझा पतंग अडकला आहे वरती, तो हवा आहे.
शाम : किती उठाठेव्या रं तुज्या बाला? पतंगासाठी तू पतंग व्हायला निंगालास? जाशील ना उडून वरच्या वर. पाप्याचं पितरं. उतार खाली.
जॉन : जा ना तू. मी माझं बघून घेईन. (वरती चढू लागतो)
शाम : दुसरा पतंग नाय मिलत बाजारात?
जॉन : मी हाच पतंग काढून देईन म्हणून पोरांना चॅलेंज देऊन आलोय. (चार-पाच पोरं झाडाजवळ येत गलका करतात)
मुलगा : जॉन दादा, काढलास का पतंग?
जॉन : (शामकडे बोट) हा काढू देत नाही.
मुलं : शाम काका आमचं काम आम्हाला करू द्या. जा इकडून.
शाम : मरा तिकडं! (जॉन खाली पडतो)
जॉन : ओ माय गॉड. वेट. मी काढून देतो. थोडं थांबा.
मुलगा : जॉन दादा, राहुदे. ते तुमचं कामच नाही. (तिकडून समुद्र किनारी फिरायला एक मराठी बाण्याचे सद्ग्रहस्थ अवतरतात)
सद्ग्रहस्थ : हे काय चालू आहे, तुमचे? मी पाहतोय बराच वेळ लांबून. पतंग काढताय का?
जॉन : हो. मग काय करायचंय तुम्हाला?
शाम : तो त्या पतंगाशी झुंजतोय आपण नको लक्ष द्यायला. पोरं पण किती बावली हायेत. याच्या नादी लागलीत. याला पतंग करून उडवला असता तरी चाललं असतं! (मुलं हसतात.)
मुलगा : ओ काका तुम्ही काढून द्या ना..
सद्ग्रहस्थ : थांबा त्यासाठी विवेकाचा मांजा शोधतो. कुठे बरं आहे मांजा. हा..तो बघा तिकडे बाजूलाच आहे. ओढा.
जॉन : ओढा काय ओढा. पतंग फाटेल ना. मी नसतं का केलं ते.
सद्ग्रहस्थ : पतंग हवेत आहे. मांजा फक्त या झाडाच्या खाली दगडात अडकला आहे. (तो ओढत पतंग खेचतात आणि देतात)
जॉन : ऑ. भारीच तुम्ही. थँक्यू. खूप हुशार निघालात हो?
सद्ग्रहस्थ : पिंडे पिंडे मतीर्भीन्न! विवेकाचा मांजा सापडला पाहिजे. पतंगासोबत हवेत उडायला. हा हा हा...! पोरांनो उडवा रे पतंग....!