

चिमणराव : महागाई खूप वाढलीय. त्यामुळे मी आता उपोषणाला बसणार गुंड्याभाऊ!
गुंड्याभाऊ : आपल्याला ते काही जमणार नाही म्हणजे नाही. तू कर उपोषण मी जरा एक लग्न उरकून येतो. जिलेबी आणि बासुंदी वाट बघतेय आमची.
चिमणराव : तुझ्या आरोग्यास हे घातक आहे. भेसळ असते हल्ली अन्नात. जाऊ नको मेजवानीला. गुंड्या ऐक माझे.
गुंड्याभाऊ : किती रे तू आळशी? जरा खात जा पोटाला. तुला खाण्याचा कंटाळा फार आणि मला न खाण्याचा. जाऊ तिथे खाऊ. सगळीकडे भेसळच आहे.
चिमणराव : खाद्यान्नाच्या किमतीत किती वाढ झालीय. आपणच मार्ग काढला पाहिजे या समस्येवर. तुझ्यासारखे बोजड नाही व्हायचंय मला. मी किरकोळ देहयष्टीचा आहे तेच बरे! बचत होते अन्नाची.
गुंड्याभाऊ : तू दुधातील भेसळ थांबवू शकणार की महागाईला रोखणार? काही फरक नाही पडत आपण उपोषणं करून. सण, समारंभ, लग्न, बारसे सगळं चालूच आहे.
चिमणराव : बाकीचे आपलं अनुकरण करतील असे वागावे. तुझं भलतच असतं बुवा!
गुंड्याभाऊ : बस झालं आता. तू येतोस की जाऊ मी?
चिमणराव : पण लग्न कोणाचे आहे? नातेवाईक आहेत का ते तुझे?
गुंड्याभाऊ : छे! माझे नाहीत.
चिमणराव : अरे, गुंड्याभाऊ मग कोणाचे? कोठेही कसा जातोस न बोलावता?
गुंड्याभाऊ : अरे ऐबतरावांनी एक बैल आणि गाय विकत आणली. आज त्यांचे लग्न आहे. त्यांच्याकडे मोजक्या खाद्यसंस्कृती जपणाऱ्या लोकांसाठी बेत आहे. तू काही त्यात बसत नाहीस, तरीही मी विचारले. जाऊदे. नको येऊ.
चिमणराव : अरे बापरे! कारण, बघा मेजवानीचं. काय लोक तुम्ही. लोक लग्नात जेवण देतात तुम्ही जेवणासाठी लग्न लावता जनावरांची ती पण. घोर कलियुग. म्हणूनच महागाई वाढलेली आहे.
गुंड्याभाऊ : महागाई वाढेल नाही, तर काय? दुसरीकडे तुझ्यासारखेपण आहेत. काही घडले तर उपोषणावर येतात. केलेले अन्न वाया घालवतात. आज खाईल, उद्या खाईल म्हणून रोज बनवायचं आणि वाया घालवायचं उपोषणाला बसून. म्हणून आम्हाला जिथे जावं तिथे खावं लागतं. महागाई गेली खड्ड्यात! (चिमणराव कोमात)