पहिला चहा | ...यापेक्षा हिब्रू भाषा शिक!

पहिला चहा | ...यापेक्षा हिब्रू भाषा शिक!
पहिला चहा | ...यापेक्षा हिब्रू भाषा शिक!
Published on
Updated on

हऱ्या-नाऱ्या कट्टर विरोधी. दोघे एकमेकांच्या भाषणांना मात्र दाद देण्यास एक पाऊलही मागे नसत. हऱ्या मराठीप्रेमी. रांगडी भाषा ओठांवर सदा रेंगाळणारी. उणीदुणी काढण्यापुरती उपयोगाची आपली तेवढीच! नाऱ्या भाषणात अडखळला की, याची टोमणेबाजी मराठीतून सुरू. इतर भाषा याच्यावर जाम चिडून; कारण तेवढा तिरस्कार प्रकट करणं इतर भाषांना जमत नाही. हे सगळ्या भाषांनी निक्षून हऱ्याला सांगितलेलं. त्यामुळे मराठीवर भारी पगडा आणि जाम राडा.

नाऱ्या : मी मराठी बोलू शकतो. भाषण पण करू शकतो. आपण ताशेरे ओढावे इतकं काही वाईट मऱ्हाटी नाय माझं.

हऱ्या : मऱ्हाटी नाही रे, मराठी बोल मराठी!

नाऱ्या : बोल मराटी. बराबर काय? आता जमले.

हऱ्या : तुझं मराठी कच्चं आहे रे नाऱ्या. तू बोलूच नकोस. यापेक्षा हिब्रू भाषा शिक. आम्हाला मराठीची लक्तरं तोडणारी माणसं नकोयत महाराष्ट्रात. मराठी शिक आधी नीट.

नाऱ्या : काय झाले? बराबर बोललो मी. मला कळते तेवढे आणि इंग्रजी भाषा कळते मला. त्यामुळे मराठी घसरतो माझी.

हऱ्या : हे राम! याने कुठे नेऊन ठेवली मराठी भाषा! याला आवरा रे.

नाऱ्या : मी माझं मी आवरते काय ते. या सभागृहात सगळ्यांचे कान लागलेत आमच्या भाषणकडे. त्यामुळे सल्ले नको आणि नंतर होणारे कल्ले नको.

हऱ्या : मर लेकाच्या. त्या कागदावर लिहिलेली अक्षरं नीट वाचता येत नाहीत का? इंग्रजीत मराठी कालवल्यासारखं काय बोलतो? मराठी ही मराठी अक्षरातच लिहिली पाहिजे. हे काय भेळ करून खातोस अक्षरांची.

नाऱ्या : मी डाएटवर आहे. तुमच्यासारखा ओबडधोबड बोकड खाणारा नाय मी. समजले?

हऱ्या : याला आवरा रे कोणी तरी. भाषणाच्या मागे लागतो आणि वर मला आपल्या चुका निर्लज्जपणे सांगतो. किळसवाणं वाटतं रे तू मराठी बोलताना. संपव ते लवकर. ऐकवत नाही. शिव शिव. (कानावर हात ठेवत.)

नाऱ्या : आम्ही असाच बोलतो. आशा नाही का तुम्हाला माझ्या मराठीची?

हऱ्या : (कोपरातून हात जोडत) ए बाबा, आशा आणि लता यांच्याविषयी काहीच नको बोलू. तेवढं सोडून बोल. तुला दंडवत घालतो हवा तर. सोड मराठीला कैदेतून आणि निघ!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news