

रमाकाकू : मी मार्केटमध्ये चालले. तुम्हाला काही आणायचं का येताना?
काका : (बातम्या पाहत) एक छानसा कुकर आण.
रमाकाकू : कुकर? आहे की घरात. अजून कशाला?
काका : तो शिटी फेकून मारतो. काल माझ्या डोक्यात पडली असती. वाचलो.
रमाकाकू : (तोंडाला पदर लावत हसतात) तुम्ही स्वयंपाक खोलीत आलेलं त्याला आवडलं नसेल.
काका : हस अजून. जे आणायचं ते नाही आणत. नको ते आणते.
रमाकाकू : तुम्हाला काय हवं ते बोला हो. कुकरचं मी बघते.
काका : मला मस्त चहा आण. इराणी कडकपत्ती.
रमाकाकू : तो कशाला? घरी आहे की पत्ती. कडकच आहे. आणि इराणीच कशाला हवी चहापत्ती?
काका : अगं, तुझ्यासोबत भांडण झालं की, इराणी चहामुळे जिंकल्याचं फील येईल. तशी तूच जिंकतेस म्हणा!
रमाकाकू : माहिती आहे ना. मग, वायफळ बडबड कशाला? जाते मी. मला उशीर होतोय.
काका : बरं जा. मला काही नकोय. शेजारच्या शांताकाकूंना तेवढं नीट ने सोबत. नेहमी सोबत येतात म्हणून म्हटलं.
रमाकाकू : (कडक पवित्र्यात) तुम्हाला त्याच्याशी काय? मी बघते काय ते. घरी लक्ष ठेवा. जीडीपी वाढला की कमी झाला, ते पहा बातम्यांमध्ये. आले मोठे...
काका : अगं, जीडीपी म्हटलं की, शांता काकूच आठवतात. सदा दागिन्यात मढलेल्या, गोलमटोल, हीही (हसत). देश अशा लोकांमुळे आबाद आहे. जीडीपीची चिंता नाही.
रमाकाकू : आणि माझ्याकडे पाहून काय वाटतं ते नाही सांगितलं?
काका : जीडीपी घसरला की काय असं वाटतं? (काका हळूच फिरकी घेत)
रमाकाकू : त्यातलं मला काही समजत नाही असं समजू नका! मी जाडी नाही म्हणून काय झालं? बरंच आहे ना?
काका : जा बाई तू मार्केटमध्ये. तुला भाजीचे भाव माझ्यापेक्षा जास्त पाठ आहेत, तेच पुष्कळ आहे. ही ही...
रमाकाकू : जाऊदे हो. पान मसाले खाऊन आणि बिडी फुंकून जीडीपीची चिंता कशाला हवी तुम्हाला?
काका : आली मूळ पदावर. चिंतन, मनन होते त्याने.
रमाकाकू : शांताकाकूंचे भाऊ अन्न प्रशासन खात्यातील महत्त्वाच्या पदावर आहेत म्हटलं. ते घरी भेटायला येत आहेत तुम्हाला. सांगायचंच राहिलं. तुमची जीडीपी की बीडीपीची व्याख्या त्यांना सांगितली तरी चालेल. (काकांनी तोंडातील विडी फेकून दिली.)