पहिला चहा | जाऊबाई जोरात!

पहिला चहा | जाऊबाई जोरात!
पहिला चहा | जाऊबाई जोरात!
Published on: 
Updated on: 

गांधी घराण्यात जावा-जावांचे नाते म्हणजे साधे नाते नव्हे. तिथे चहाला साखर किती घालायची, यापासून ते राजकीय वारसा कोणाकडे जाणार, इथपर्यंत प्रत्येक गोष्टीला राष्ट्रीय महत्त्व असण्याची शक्यता होती. सामान्य घरात जावा एकमेकींच्या स्वयंपाकावर लक्ष ठेवतात. इथे एकमेकींच्या राजकीय विधानांवर लक्ष ठेवण्याची परंपरा असावी!

सोनियाजींनी आत्मचरित्र लिहिले, ते सध्या चांगेलच गाजतेय. सोनियाजींच्या जाऊबाई माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याविषयी आत्मचरित्रातील काही भाग समोर आला आहे. हे सर्व तपशील वाचल्यानंतर वाचकांनी तोंडात बोटे घातली आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागून राहिली आहे ती याची की, या आत्मचरित्राविषयी यांची मनेका यांची काय प्रतिक्रिया असणार याची. आता मनेका गांधींनीही आत्मचरित्र लिहायचे ठरवले, तर प्रकाशकांची चांदीच होईल. पुस्तकाचे नावही तयार आहे, ‘मेरी प्यारी जाऊ!’ म्हणजे त्यातून एक साखळीच तयार होऊन जाईल. सोनियांच्या पुस्तकावर मनेका प्रतिक्रिया देणार, मनेका बोलल्या की काँग्रेसवाले त्याचा अर्थ लावणार आणि भाजपवाले त्यातून राजकीय फायदा शोधणार. म्हणजे पुस्तक एका घरातले; पण त्याची चर्चा संपूर्ण देशात!

खरे तर, गांधी घराण्यात एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रयोग झाला असता, तर देशाला एक वेगळाच राजकीय नमुना मिळाला असता. सकाळी नाश्त्याच्या टेबलावर चहा-कॉफीबरोबर पक्षीय भूमिका ठरल्या असत्या. दुपारी जेवणाच्या वेळी संसदीय रणनीती आणि रात्रीच्या जेवणाला विरोधकांवर टीका! घरात रिमोट कुणाच्या हातात, यावरूनही कदाचित पक्षांतर्गत निवडणूक घ्यावी लागली असती. आता प्रश्न एवढाच की, या जावा एकमेकींच्या पुस्तकांना भेट म्हणून पाठवतील का? आणि पाठवलेच तर आतल्या पानांवर ‘सप्रेम भेट’ लिहितील की ‘कृपया संपूर्ण वाचावे’ अशी सूचना देतील? कारण, राजकारणात विरोधकांचे भाषण ऐकण्याची तयारी नसली, तरी आत्मचरित्रातील आपल्याविषयीचे प्रकरण वाचण्याची उत्सुकता मात्र असतेच!

संसदेत विरोधकांना उत्तर देणे सोपे; पण घरातल्या जावेला उत्तर देणे कठीण. संसदेत सभापती असतो. घरात मात्र कोणाचीही तक्रार ऐकणारा निष्पक्ष सभापती नसतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, संसदेचे कामकाज तहकूब करता येते. घरगुती चर्चेला मात्र पुढची तारीख मिळत नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.