

जंगलातील सभेत कोल्हा जोमात भाषण करतो.
कोल्हा : आम्ही दोघे भाऊ मी आणि लांडगेडादा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही सर्व ज्ञानी आहात. तो अज्ञानाचा मुखवटा चेहऱ्यावरून हटवा. आपण खूप मोठी प्रगती करणार आहोत. प्राणी आहोत आपण हे विसरूया!
साळिंद्र : कोल्हेदादा जपून, मापून बोला.
कोल्हा : आम्ही बघून घेऊ. तुम्ही सटका.
साळिंद्र : निवडून कोण येणार, हा मुद्दा असेल, तर आम्ही आताच सभेतून चालते होतो.
कोल्हा : निवडून येणे हा योग आयोग आहे. आमच्या नशिबी वियोगच आहे. जंगलचा राजा असताना आम्हाला कोण निवडून देईल?
साळिंद्र : माहिती असताना कशाला आटापिटा?
कोल्हा : आम्ही बोलणार. सभा आमची आहे. तुम्ही नका टोकाचं बोलू. अंगावर काटे येतात आमच्या तुम्ही बोलू लागला की! गप्प बसा. काटेरी फळ कुठचे. अरे जा ना बाबा. बोलू दे. (साळिंद्र जाते) दादा आता तू बोल काहीतरी.
लांडगा : हो. जे विरोध करत आहेत ते जाऊदेत. इथे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो आणि सर्व पक्षीवृंद यांचं मनापासून स्वागत, तर माझं लक्ष पक्ष्यांकडेही आहे. प्राण्यांकडेही आहे. आमचे बंधू आमच्यासोबत आहेत याचा गर्व आहे आम्हाला. आपण प्रगतिपथावर आहोत. अडाणी प्राणी आपल्याला भरकटवतील. आपण ज्ञानाची कास धरू.
पक्षीवृंद : आम्ही तेच म्हणतो. कोण ज्ञानी ते आम्हाला ठरवू द्या. तुम्ही नका अक्कल शिकवू. सभा संपली की, सर्व पक्ष्यांचा फडशा पाडणार, हे आम्हाला माहिती असताना आम्ही कसे काय आपल्या बाजूने उभे राहू ते सांगा.
कोल्हा : मग, आम्ही काय शाकाहारी बनू? आम्ही मांसाहार करणारे बुळबुळीत बोलून कसे चालेल. आम्ही देव नाही दया करायला.
पक्षी : मग, ही कोल्हेकुई थांबवा. आम्हाला जंगलात शांतता हवी आहे. आम्ही इतरवेळी आपण प्राणी दिसला की, जीव वाचवून पळत सुटतो. काहीही टीका करत असता. तुमच्या हाती आमचं भविष्य का म्हणून देऊ? कोण आपणास साथ देत असतील तर देवोत. आम्ही पक्षी नाही. चला रे. (पक्षी उडून जातात)
कोल्हा : कोणाला जायचं ते जाऊ शकता. जंगल नाही आमचं; पण आमचा एक वेगळा एरिया आहे. आम्ही पार्क करू प्राण्यांचे. मग तर सगळे आमचेच.
लांडगा : हो. आमचे पूर्वज आमच्या बाजूने नसतील. त्यांचं वाघाचं काळीज होतं. आम्ही आमचे लांडग्याचे गुण मात्र सोडू शकत नाही. माफी असावी. कोण राहणार सोबत त्यांनी थांबावे. (लांडगे आणि कोल्हे राहतात. बाकी निघून जातात.)
कोल्हा : आपली साथ अशीच राहूदे. तूर्तास सभा समाप्त. धन्यवाद!