पहिला चहा | मी शेंगा खाल्ल्या नाहीत...

पहिला चहा  | मी शेंगा खाल्ल्या नाहीत...
पहिला चहा | मी शेंगा खाल्ल्या नाहीत...
Published on: 
Updated on: 

रामा : अरे तो शिवा बोलत होता तू त्याच्या रानातले ५०० आंबे घेतलेस म्हणून...

गोविंदा : रामा, त्या शिवाचं डोस्कं फिरलंय. त्याला म्हणावं, मी कधीच तुझ्या रानातनं गेलो नाही. पण, काही लोक मला बदनाम करण्यासाठी माझं नाव घेतायत. मला बी दसऱ्याच्या दिवशी आपल्या पलीकडच्या गावातील बया हेच बोलत हुती. मी तिला शिवाच्या बा समुर नेणार हाय आणि विचारणार हाय की मी कवा तुमच्या रानातलं आंबे नेले हायती म्हणून...

रामा : अरे थांब, जरा वेसन घाल तुझ्या तोंडाला, तू नाही ना नेलेस मग कशाला एवढा चवताळतोयस...

गोविंदा : अरे रामा, माझी जनमानसात काही तरी इज्जत आहे आणि मी गावचं आणि समाजाचं हित बघणारा मनुष्य आहे. ह्याच्या अगोदर मी गावच्या आणि समाजाच्या भानगडी मिटवण्यासाठी किता डाव गावच्या पंचायतीसमुर उपोषणाला बसलो आहे. समाजाच्या प्रश्नासाठी मुंबईलाबी जाऊन आलोय. हे बघ रामा, मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी काहून टरफलं उचलू... लयंच त्यांचं तोंड चालत असंल तर पुन्ह्या डाव अख्ख्या समाजाला घेऊन न्यायासाठी अंतरमनाने पंचायतीसमुर उपोषणाला बसीन. मग त्याच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी ५०-५० आंबे खाल्ल्याती, त्यांचे सगळ्यांचे आंबे बाहेर काढीन आणि मग आयुष्यात पुन्ह्यांदा आंब्याचं नाव काढायची नाहीत...

रामा : अरे गोविंदा, तू एवढं उपोषणाला बसू नको बघ. तू नुसतं उपोषणाचं नाव काढलंस तरी छातीत कळं येते काही जणांच्या...

गोविंदा : मग त्यांनीबी पुन्ह्या डाव ५०० आंबे दिल्यात म्हणायचं काम नाही...

रामा : थंड हो... शेवंते थंड सरबत आण गं... गोविंदा काकाला आणि मला...

गोविंदा : (सरबताचा ग्लास हातात घेत) रामा, तू मित्र हायस म्हणून सांगतो, पण गावातल्या लोकांनी माझ्या नावानं आंबट तोंड करू नये. आंबे कुणी खाल्लेत ते शोधा, पण माझ्या नावाचा आंबा पाडू नका!

रामा : (हसत) व्हय गोविंदा, आता सरबत पी आणि डोकं थंड ठेव. नायतर आंब्याच्या झाडापेक्षा गावात तुझ्याच नावाची जास्त चर्चा होईल!

गोविंदा : (रागानं) रामा, तू माझा मित्र हायस की शिवाचा वकील?

रामा : नाय रे बाबा, मी तर दोघांचाबी मित्र हाय. मला फक्त गावात शांतता पाहिजे. नायतर उद्या आंब्याच्या झाडाखाली बैठक भरंल... हाहाहाहा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news