

भ्रमाचा भोपळा फुटावा आणि डीजेचा घडा भरावा यात साम्य आहे. वातावरणातील भ्रमित फलितं नियमबाह्य पद्धतीने फलद्रुप होतात तसा भ्रमाचा भोपळाही फुटायला वेळ लागत नाही आणि पापाचा घडाही भरायला वेळ लागत नाही. असो, असे भले मोठे तत्त्वज्ञान सांगण्याचे धाडस शेजारच्या बापटांच्या सुपुत्रामुळे झाले. क्षमस्व वाचकवृंद! असामान्य वाक्यं ऐकून आमच्या सामान्यांचे कर्ण बधिर होतात आणि अशी अवघड वाक्यं सुचतात. बापट सांगतात ते एकअर्थी बरोबर असावे की नसावे? हे साध्य आणि असाध्य कसे? यात दोन गट पडतात आणि वार्ताहर याचा जाब बापटांना विचारताना हातापायी होते हे चित्र विचित्रम आहे. संस्कृतने सुसंस्कृत होता येते हे बापटभाऊंनी सिद्ध केले. ज्या गावी जावे त्यास वळसा घालून जाण्याचे फील बापटांच्या मराठी भाषेने दिले. भ्रमणध्वनी करी असता यत्र तत्र सर्वत्र भ्रमण केल्याचा भास होतो. नेमके फलित समोर येते. आता कुठे काय झाले पाहावया जावे नाही लागत. भ्रमणध्वनी जिथे, तिथे सर्व साध्य होते. सध्या तरी हीच स्थिती आहे. एक वृत्तपत्र वाचक जोशी दुसऱ्या रीळ पाहून वर्तमानात नसलेल्या मोबाईलधारकाला दोषींना काय म्हणतो पाहा...!
जोशी : अहो दोषी, हे काय ऐकत आहात आपण मघापासून? घटं भिंद्द्यात, पटं छिंद्यात? रीळमधून काय मथळा सापडतो का बातमीचा? तेच तेच बघत आहात मघापासून. वर्तमानात अवतरा.
दोषी : अहो जोशी, एक व्यक्ती डीजे विरोधात उठला आहे. मला तर काय तेची मराठी ऐकायला जम्मलीच नाय.
जोशी : अरेरे! काय करावे तुमचे? मराठी समजली नाही असे म्हणायचे. जमली नाही काय?
दोषी : असं काय? रवांदे. जमले ते बोलले.
जोशी : तो बोलतो, ती बोलते. असं असतं ते. जाऊदे. तो सुसंस्कृत संस्कृत भाषा बोलतो. मराठी एकच आहे. तुम्ही ती वेगळ्या अँगलने घेता.
दोषी : खरी बात छे; पण डीजे वाजणार नाय काय गणपतीला ये बरस? देणगी दिली मी एक लाख रुपये. तुमचे काय ज्याते?
जोशी : पण, बापट बोलतात ते खरे बोलतात. घटं भिंद्यात, पटं छिंद्यात! बाप्पांना शांतता हवीय आता. तुम्ही देणग्या देऊन
पोरांना डीजे वाजवायला भाग पाडता
मोठेपणा मिरवण्यासाठी. हे बाप्पांना समजले. म्हणून बाप्पांनी बापटांच्या कानावर घातले. बसा घरी डीजे वाजवत. डीजे वाजवतात देणग्या देऊन..!