पहिला चहा | येथे लाडू फोडून मिळतील...

पहिला चहा |
पहिला चहा | येथे लाडू फोडून मिळतील...
Published on: 
Updated on: 

दिवाळी झाली. परंतु, मोठ्या हौसेने केलेले लाडू फुटायला तयार नव्हते. चकल्या कितीही ताणल्या तरी तुटायला तयार नव्हत्या. वड्या खुसखुशीत होण्याऐवजी वातट झाल्या होत्या. अशा काही गहन समस्या सोडवायला काही फेरीवाले गल्लीबोळातून हातात सायकल घेऊन फिरत होते. ओडरत होते, लाडू फोडून मिळतील...

वामनराव : काय आणलंय हो फेरीवाला मामा तुम्ही...

फेरीवाले : दिवाळीचे लाडू फुटत नसतील तर आम्ही फोडून देऊ. चकल्या तुटत नसतील तर आम्ही तोडून देऊ. इतर फराळांबाबतही आमची ही स्कीम आहेच...

वामनराव : काय दर आहे तुमचा?

फेरीवाले : १० रुपयाला एक या दराने आम्ही लाडू फोडून देऊ. बाहेर तुम्हाला १५ ला दोन पडतील.

वामनराव : आमच्याकडे फराळाला पाहुणे आले होते. पण त्यांना लाडूच फुटले नाहीत. रव्याचा लाडू फोडताना पुढचा एक दात पडला त्यांचा.

गोविंदराव : काय सांगता वामनराव. मग चकल्या तोडताना दातांची काय गत झाली असेल...

फेरीवाले : म्हणून तर आम्ही हा व्यवसाय सुरू केला आहे. दात पडण्यापेक्षा १० रुपये खर्च केलेले कधीही चांगले, नाही का...?

वामनराव : अहो, लाडू चांगले जमावेत म्हणून आमच्या सौंनी शेजारच्या काकूंना बोलावले होते.

गोविंदराव : बहुदा यामुळेच या लाडवांची ही गत झाली असावी. स्त्रिया ह्याला विचार, त्याला विचार असे करतात. त्यातून फराळाचे पदार्थ बिघडत राहतात...

वामनराव : पाक तयार झाला की नाही, हे बघता बघता पाक बिघडून जातो. आणि लाडू फुटता फुटत नाही. चकल्यांचे पण असेच होते.

फेरीवाले : म्हणून तर आम्हाला काम मिळते हो साहेब. फराळ बिघडून जातो. त्याला माणसात आणण्यासाठी आम्ही मदतीला धावून येतो. चला लाडू फोडून हवेत का... अजून जास्त दिवस वाट पाहाल तर मुंडे साहेब येतील लाडू फोडायला आणि मग तुम्हाला जावे लागेल खडी फोडायला...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.