

वृद्धांच्या वनातील एक गवळण म्हणून ओळख निर्माण झालेले आसामी एक ग्रंथ वाचून, ‘वासरात लंगडी गाय शहाणी’प्रमाणे; कोणतीही शहानिशा न करता वृद्धाचार्यपदावर आसनस्थ झाली. समस्त वृद्धवन गहिवरले. ज्ञानाची लयलूट होणार, ध्यान, तपस्या, असे इव्हेंट इव्हेंच्युअली होणार. गण येतील, नाचतील, प्रश्न विचारतील. एक वेगळे आश्रम प्रस्थापित होणार. प्रत्येकाचा आनंद निराळा. काहींनी, माईक रनरचे काम करायचे, काहींनी स्टेजची शोभा वाढवायची, अशी कामं वाटून घेतली. वृद्धाचार्यांना आता राहवेना. सगळी व्यवस्था झाली. कुठून कुठून लोक प्रश्न घेऊन आले आणि त्या प्रश्नमंजुषेला एक वेगळीच दिशा मिळाली. काय एकेक प्रश्न, वृद्धाचार्य नुसते फेकूवृत्तीने उत्तरांचे बाण फेकत राहिले. जाऊया म्हटलं वृद्धवनात किती पण फर्लांग जावे लागले तरी चालेल. तिकीट काढले आणि पोहोचलो. तर भक्तांची प्रश्नांची आतषबाजी चालू होती..!
भक्त : वृद्धाचार्य जी... राधे राधे!
वृद्धाचार्य : राधे राधे. बोला काय प्रश्न आहे?
भक्त : तुम्ही वृद्धाचार्य आहात; पण वृद्ध नाही. मी भक्त आहे; पण तुमचा भक्त नाही; पण मला व्हायचे आहे.
वृद्धाचार्य : का बरं? तुम्ही इथे कोणता प्रश्न उपस्थित करत आहात ते बोला!
भक्त : हे सर्व इथे तुमचे भक्त म्हणून आलेत. हे कसं काय? आपण कोणते चमत्कार केले का? की येनकेनप्रकारें प्रसिद्ध व्हायचंय आपणास?
वृद्धाचार्य : मी चमत्कार नाही करत. तुम्ही इथपर्यंत आलात हाच आमचा चमत्कार समजा. ही त्याचीच इच्छा.
भक्त : बरं. माझा प्रश्न आहे, रावणाला डोकी किती? तुम्ही तर त्याचे लाख पुत्र आणि दीड लाख नातवंडं म्हणून सांगता प्रवचनात. ते कसं काय?
वृद्धाचार्य : ये राज की बात है. मैं नहीं बोलूंगा. रावणचे दहाच तोंड होते. बसा खाली. यात आता गणित नको. (हशा)
भक्त : (गोंधळात) अहो गुरुजी; पण हे कसं शक्य आहे? शक्यता सांगा?
वृद्धाचार्य : हा प्रश्न महाभारताबद्दल नाही पडला? की शंभर कौरव कसे जन्मले? वाद हा एकाच बाजूने असतो का? तर याचं उत्तर असं की, रावणाने तपस्या करून पुत्रप्राप्त केले होते.
भक्त : मला पण ते कोडे आहे. मीही पुत्रप्राप्तीसाठी कोणती तपस्या करावी हे विचारण्यासाठी आलोय. रावणाने कोणती तपस्या केली होती? ती सांगाल का?
वृद्धाचार्य : कहाणी में ये ठीक है. तुम्हाला त्यासाठी दहा तोंडाचा रावण व्हावे लागेल. तपस्या अर्धांगिनी का नाम रखो. बाकीचं नंतर बघू. राधे राधे. सभा समाप्त. (वृद्धाचार्यांनी स्वतःच्या जोकवर हसत रीलचा बिझनेस टाकला)