

श्रावण मासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात इकडे, क्षणात तिकडे..! सकाळी उठताच बाहेरचा कोसळणारा पाऊस आणि भिजलेली झाडं पाहिली आणि या ओळी आठवल्या. आजकाल पाऊस कोठेही पडतो. क्षणात ऊन, क्षणात पाऊस. हल्ली जिकडे-तिकडे पक्षांचं अवकाळी आगमन या झाडावरून त्या झाडावर. कोकिळेला मार्च आणि जूनमधील अंतर हल्ली लक्षातच राहिना; अवकाळी ऊन पाहून उगाच वाटत राहतं उन्हाळा अजून संपला नाही; पण कोणत्याही पक्षाने वार, महिना ठरवून ओरडावे असं नाही. ऋतूप्रमाणे ते आपलं प्रस्थान इकडून तिकडे करत राहतात.
आजकाल माणसांनाही समजेना कधी कुठे अवकाळावं. जिथे जे नसावे तिथे ते ते हल्ली प्रकटतात. असं वाटून जातं आता यातून पुढे काय? पण पुढे काहीच घडत नाही. फक्त पक्षांचंं स्थलांतरण या झाडावरून त्या झाडावर! ऋतू कोणताही असो. कोणताही पक्षी कुठेही दिसतो. आजकाल कावळे पाणवठ्यावर आणि बगळे गोठ्यावर फिरताना जास्त दिसू लागले. व्हाईट कॉलरची हौस बाळगणारे कावळे पण सध्या गोठ्यांवर घिरट्या घालताना दिसले. एकदा एक बगळा कावळ्याला म्हणाला, ‘किती कावकाव करता राव, मयताचा नैवेद्य पण गोड लागतो तुम्हाला, कसं काय राव? आम्हाला तर तिकडे पाहिलं की अश्रू थांबत नाहीत, म्हणून पाणवठ्यावर जाऊन ढसाढसा अश्रू गाळतो, कोणाला समजू नये या हेतूने. पायात त्राण न राहिल्याने एका पायावर उभा राहतो गड्या, काय सांगू.’
ते ऐकून कावळा संतप्त होतो. ‘हो का बगळेराव, उत्तरकार्याचे मानकरी आम्ही असलो तरी आमची चोच आणि पोहोच तुमच्याइतकी नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याच पक्षांशी युती, थेट भेट नाही करत.’ बगळा बोलू लागतो. ‘आम्हाला मोठमोठे कांड निपटावे लागतात म्हणून चोच मोठी दिली देवाने, परवा तर अमेरिकेतले डिनर इंडियामध्ये बसून केले. एवढी चोच लांब करावी लागली. आम्हाला सेलिब्रिटींच्या मयताचे बोलावणे येते. व्हाईट कॉलर असल्याने शोकसभेसाठी. त्याला हजेरी लावावी लागते. तिथे लोकंही सफेद वस्त्रात येतात, त्यामुळे आम्ही तिथे शोभून दिसतो.
आता उद्या जाणार आहे एका मातेच्या घरी, तिकडे आम्हाला खास घोळ निस्तरायचा आहे. त्यांच्या मुलाने एका शूटिंगच्या सेटवर तळ्यातला छोटा मासा फस्त केला. आता डोमकावळ्यांना आरोप करायला वाव मिळाल्याने आम्हाला त्यांनी मदतीसाठी बोलावणं धाडलं. मला म्हणाले, तुमची चोच (पोहोच) वरपर्यंत आहे. तेवढं कावळ्यांना समजवा. मी निघतो तिकडे आताच. आपले भाऊबंद हुसकावायचे काम दिलंय. याची दखल देतो आपणास. ते आम्हाला देवासमान मानतात.’ असे म्हणत बगळ्याने त्या बंगल्याकडे प्रस्थान केले.