

चैत्राची चांदणी आकाशात लखलखत असताना अमावस्येचा अंधार दाटावा तसं अगदी काहीतरी झालं आणि दोन वीरांगनाच म्हणाव्या लागतील अर्थात, आखाड्यात उतरल्यागत भांडू लागल्या. एकीकडे दाट ढग आणि दुसरीकडे लखलखणारा चंद्र मधेच डोकावून अंधारात लुप्त होत होता. चैत्र चांदणी लागली अंधाराशी झुंजायला. पाहूया पुढे..!
चैत्र चांदणी : अगं ये निशा, ढगात कुठे लपतेस. काळोख आहेस तू नुसता. लपून काय उपयोग तरी आहे का?
निशा : निशा म्हणतात मला. मी कुठे लपले. मी आहेच अशी. न दिसणारी, सर्वत्र अंधारच अंधार घेऊन येणारी. तुझ्यासारखी दिमाख नाही दाखवत.
चैत्र चांदणी : दिमाख दाखवावा नाही लागत गं बयो. तो असावा लागतो आधी.
निशा : तुझी आणि माझी गट्टी कधीच होणार नाही. तू राहा चमचम करत; पण माझ्या नादी नको लागू.
चैत्र चांदणी : मी अंधाराची दिशा बदलते. तू बदलून दाखव पाहूया चैत्राच्या चांदण्यांना, त्यांच्या चमचम करणाऱ्या प्रकाशाला!
निशा : आली मोठी शहाणी. दिवसा चंद्र-तारे असतात का? काय उपयोग. आमच्याशिवाय तुम्हाला काही महत्त्व नाही.
चैत्र चांदणी : होय गं बाई. अगदी खरं बोलली तू. तुमच्यासारखे निंदा करणारे असले की, अगदी लखलखून प्रकाशावं वाटतं गं बयो. बावनकशी खरंय.
निशा : आम्ही निंदा नाही करत. तुमचे तोरे झेलतो म्हणून अंधार येतो आमच्या नशिबी. काय सांगावं आणि काय नको.
चैत्र चांदणी : तोरे तर आम्ही मिरवूच आणि आता तर जास्तच जोमात, जोशात, बघच तू.
निशा : आता वर्षाचे गाऱ्हाणे चालू झाले की, तुमचा नामोनिशाण मिटणार; मग अंधाराशिवाय पर्याय नाही लपाछपीला.
चैत्र चांदणी : वर्षा येवो नाहीतर कोणी येऊ देत, या अंधाराशी सामना करण्यात जी मजा आहे ती कोणत्या ऋतूमध्ये नाही. मजा येते डीबेटिंगमध्ये. (गाणं गुणगुणत) ‘मी कशाला आरशात पाहू गं! मीच माझ्या रूपाची राणी गं.’ कोळसा कितीही उगाळला तरी काळाच. बस मेले अंधारातच..!