पहिला चहा | भाजी घ्या भाजी...!

पहिला चहा | भाजी घ्या भाजी...!
पहिला चहा | भाजी घ्या भाजी...!
Published on
Updated on

भाजीवाली : (टोपलीधारक. एका हमरस्त्यावर ) वांगी घ्या वांगी. शंभर रुपये किलो वांगी!

ग्राहक बाई : (पिशवीधारक बाई. हाताला धरलेले लहान लेकरू) ए भाजीवाली. थांब ना गं बाई. केव्हाची हाक देतेय. एक्स्प्रेस आहेस की काय धावायला.

भाजीवाली : (डोक्यावरची टोपली आवरत मागे वळते) एक्स्प्रेस काय असतंय ते. मराठीत बोला आणि नीट बोला... काय पाहिजे. टोपलीला हात लावा वाईच. लय जड झाली बघा टोपली.

ग्राहक बाई : अगं बाई. लेकरू आहे हाताशी. गाड्या येतात आजूबाजूला. राहुदे भाजी. चायनिज मनच्याव, खाऊ आजच्या दिवस. कोण खाणार वांगी मेली. (लेकरू खूश)

भाजीवाली : थांबा थांबा. काय पायजेल तुमास्नी. त्या कटड्यावर ठेवते टोपली. चला तिकडं. अहो ताजी वांगी हायत. मेली वांगी काय भरली वांगी करा. छान लागत्याल.

ग्राहक बाई : अगं बाई टोपली किती अस्वच्छ आहे ती. मी नाही घेणार भाजी तुझ्याकडून.

भाजीवाली : या कटड्यावर काय उपोषणासाठी आले. मगाशीच बोलायचा हुता. वांगी पडली ना टोपलीतून.

ग्राहक बाई : त्याला मी काय करू बाई. टोपली स्वच्छ आहे का तुझी भाजीची? मुंडे आलेत आता. स्वच्छता हवी. लोक आजारी पडत आहेत अशाने.

भाजीवाली : ते न खाता बी आजारी पडत्यात. मनच्याव च्यावम्याँव असलं खाणं खाल्ल्यावर काय हुनार दुसरं.

ग्राहक बाई : अगं नकोय मला भाजी आता. किती मार्केटिंग करशील त्या भाज्यांचं? किती माश्या घोंगावताहेत बघ त्या.

भाजीवाली : काय तुम्ही नको ती कारणं देतायसा. नको तर नको. माजी भाजी काय रस्त्यावर न्हाई आली.

ग्राहक बाई : अगं मला दुखवायचं नव्हतं तुला. दे किलोभर वांगी. जाऊदे. शंभराची नोट वाचवून कुठे जायचंय फॉरेनला. चांगली दे बघून.

भाजीवाली : (मोजमाप करत) हे घ्या ताई. एक कमी पडतंय वजनात. पैसं कमी द्या.

ग्राहक बाई : ते कुठे चुकले एखादे?

भाजीवाली : जाऊदे हो. एकाने काय बिघडलं. घेऊन टाका. स्वच्छ हाताने स्वयंपाक करा. धरा.

ग्राहक बाई : (आ वासून) हे घे शंभर आणि दे इकडे जेवढे आहेत तेवढे बस. धन्य आहे तुझी..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news