

अक्षय निर्मळे
महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणूक निकालानंतर संभाव्य महापौर कोण असतील, याची चर्चा सुरू असतानाच नेदरलँडमधील एक महापौर चर्चेत आले आहेत. आयुष्याने सर्व काही दिले असतानाही अपूर्ण वाटत राहणे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे फाल्गुन बिनेंडाइक. नेदरलँडस्मधील हीमस्टेड शहराचे ते महापौर. चार मुलांचे वडील, स्थिर कुटुंब आणि सार्वजनिक प्रतिष्ठा लाभलेला हा माणूस भारतात आला आहे ते जन्मदात्या आईला शोधण्यासाठी.
नागपूरमध्ये 1985 साली एका अविवाहित आईच्या पोटी जन्मलेले फाल्गुन तीन दिवसांचे असतानाच एका आश्रमात ठेवले गेले. सामाजिक दबाव आणि असुरक्षिततेच्या ओझ्याखाली एका तरुणीने तो निर्णय घेतला असावा. पण, महिन्याभरातच फाल्गुन हे नेदरलँडस्मधील पालकांकडे दत्तक गेले. त्यांचे पुढचे आयुष्य सुरक्षित, प्रेमळ आणि संधींनी परिपूर्ण होते. विशेष म्हणजे त्यांची दत्तक ओळख कधीही लपवली गेली नाही. तरीही त्यांच्यासाठी मम्मी कोण आहे, हा प्रश्न काळाच्या ओघात अधिक तीव्र होत गेला.
फाल्गुन यांचा संघर्ष भूतकाळापेक्षा त्यांच्या आयुष्यातील पोकळीविरुद्ध असावा. कारण त्यांनी कधीही जन्मदात्या आईविषयी कटुता व्यक्त केलेली नाही. उलट, ‘तिने जे केले ते चुकीचे होते, असे तिलाच वाटत असेल. मला फक्त तिला सांगायचे आहे की तिचे मूल सुखात वाढले,’ हे त्यांचे शब्द त्यांच्या परिपक्वतेची साक्ष देतात. या शोधाला त्यांनी महाभारतातील कर्णाशी जोडले आहे. प्रत्येक कर्णाला कुंतीला भेटण्याचा हक्क आहे, असे ते म्हणतात. मात्र, फाल्गुन यांचा कर्ण वेगळा आहे. तो युद्धभूमीवर उभा नाही; तो स्मृतींच्या, कागदपत्रांच्या आणि विस्मृतीच्या जंगलातून वाट काढतो आहे. प्रशासन, स्वयंसेवी संस्था, पोलिस यांच्याशी सातत्याने संपर्क साधत ते आईला एकदा भेटण्याच्या क्षणासाठी प्रयत्नशील आहेत.
फाल्गुन यांची नम्रता त्यांना केवळ भावनिक उंची देत नाही, तर नैतिक वजनही देते. त्यामुळे त्यांची कहाणी आईच्या शोधापुरती मर्यादित राहात नाही. ती आपल्याला हे शिकवते की, माणूस कितीही उंचीवर पोहोचला, कितीही सुरक्षित आणि यशस्वी आयुष्य जगला, तरी ओळखीचा एक धागा सुटलेला असेल तर अंतर्मन अस्वस्थच राहते. त्यांच्या शोधात सूड, प्रश्न, राग, आरोप नाही. आहे ती केवळ संवादाची आणि स्वीकाराची आस. फाल्गुन यांंचा शोध कोणावर बोट दाखवणारा नाही, तर काळ, परिस्थिती आणि समाज यांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. या शोधातून एक प्रश्नही उभा राहतो- आपण समाजातील अशा क्षणांना किती संवेदनशीलतेने हाताळतो? म्हणूनच फाल्गुन यांची ही कहाणी सामूहिक आत्मपरीक्षणाची संधी ठरते. आज जग सत्ता, ओळख आणि अधिकारांभोवती अधिक कठोर होत चालले असताना फाल्गुन बिनेंडाईक यांचा हा शांत, संयमी शोध आपल्याला माणुसकीची आठवण करून देतो. ही भेट होईल की नाही हे सध्या सांगता येत नाही. पण, स्वीकाराच्या वाटेवर चालणारे फाल्गुन बिनेंडाईक हे केवळ एका शहराचे महापौर म्हणून नव्हे तर आपल्या काळाचे संवेदनशील प्रतिनिधी म्हणून लक्षात राहतील.