Face Unlock Door | ‘मनी’ अन् ‘टॉमी’साठी फेस अनलॉक दरवाजा

Face Unlock Door |
Face Unlock Door | ‘मनी’ अन् ‘टॉमी’साठी फेस अनलॉक दरवाजा
Published on: 
Updated on: 

आशिष शिंदे

आपण आपल्या स्मार्टफोनकडे नुसती नजर टाकताच फोनचा लॉक क्षणात उघडतो किंवा घराच्या स्मार्ट डोअरबेलसमोर उभे राहताच मालकाचा चेहरा ओळखून दरवाजा आपोआप खुला होतो. तंत्रज्ञानाची हीच जादू आता घरातील मुक्या सदस्यांच्या म्हणजेच पाळीव प्राण्यांच्या विश्वातही अवतरली आहे. तुमची लाडकी ‘मनी’ किंवा ‘टॉमी’ घराच्या दाराजवळ येताच त्यांचा चेहरा स्कॅन होऊन दरवाजा आपोआप उघडणार आणि दुसराच एखादा भटका प्राणी आत येण्याचा प्रयत्न करू लागला, तर दरवाजा घट्ट बंद राहणार. हे वाचायला एखाद्या साय-फाय चित्रपटातील कल्पनेसारखे वाटेल; पण हे शंभर टक्के खरे आहे. गळ्यात मायक्रोचिप किंवा कॉलर पट्टा बांधण्याच्या कटकटीला आणि पारंपरिक ‘पेट डोअर’मधून घरात घुसणाऱ्या उपद्रवी पाहुण्यांच्या त्रासाला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी, चेहरा ओळखून प्रवेश देणारा हा भन्नाट आणि बुद्धिवान ‘स्मार्ट पेट डोअर’ आता ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये दाखल झाला आहे.

या नावीन्यपूर्ण दरवाजाचे सर्वात मोठे आणि थक्क करणारे वैशिष्ट्य म्हणजे यातील ‘एआय फेशियल रेकग्निशन’ अर्थात चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान होय. ज्याप्रमाणे आज आपला स्मार्टफोन मालकाचा चेहरा ओळखून क्षणात अनलॉक होतो, अगदी त्याच पद्धतीने हा दरवाजा आपल्या घरातील पाळीव प्राण्याचा चेहरा स्कॅन करतो. स्मार्टफोनच्या ॲपमध्ये केवळ आपल्या पाळीव प्राण्याचा एक छोटा व्हिडीओ अपलोड केला की, यंत्रणा त्याचे स्वतंत्र प्रोफाईल तयार करते. अशा प्रकारे एकाच वेळी दहा पाळीव प्राण्यांचे चेहरे या यंत्रणेत नोंदवता येतात. आपला प्राणी दरवाजाजवळ येताच कॅमेरा त्याचा चेहरा ओळखतो आणि स्वयंचलित लॉक खाली सरकवून दरवाजा उघडतो. तर अनोळखी प्राणी आल्यास हा दरवाजा घट्ट बंद राहतो.

मांजर किंवा कुत्रा पाळणाऱ्यांना अनेकदा एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागते. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ही प्राणीमंडळी बाहेरून शिकार केलेला उंदीर, पक्षी किंवा एखादा साप तोंडात धरून थेट स्वयंपाकघरात आणून टाकतात. या ‘अनावश्यक भेटींपासून’ घरमालकांची सुटका करण्यासाठी या दरवाजात एक अत्यंत बुद्धिमान ‘फॉरेन ऑब्जेक्ट डिटेक्शन’ प्रणाली बसवली आहे. जर तुमच्या पाळीव प्राण्याच्या तोंडात कोणतीही अनोळखी वस्तू, पक्षी किंवा सरपटणारा जीव असेल, तर दरवाजावरील सेन्सर्स ते तत्काळ टिपतात. जोपर्यंत प्राणी ती वस्तू बाहेर टाकत नाही, तोपर्यंत हा दरवाजा उघडतच नाही.

आपण कार्यालयात किंवा बाहेरगावी असतानाही आपल्या लाडक्या प्राण्याच्या हालचालींवर थेट व्हिडीओद्वारे नजर ठेवता येते. प्राणी दिवसातून किती वेळा बाहेर गेला आणि कधी परत आला, याची अचूक नोंद ॲपमध्ये राहते. तसेच रात्रीच्या अंधारात चेहरा स्पष्ट दिसावा यासाठी दरवाजाला स्वयंचलित ‘फिल लाईट’ असून प्रकाशाच्या बदलत्या स्थितीनुसार चेहरा ओळखण्याची अचूकता ॲपमधून कमी जास्त करता येते.

वापरण्यास अत्यंत सोपा असणारा हा स्मार्ट दरवाजा एका पूर्ण चार्जिंगवर तब्बल पंधरा दिवस सहज चालतो. चार्जिंगसाठी दोन स्वतंत्र पोर्टस्‌ दिले असून सोबत मिळणाऱ्या केबलच्या मदतीने रात्रभरात तो पूर्ण चार्ज होतो. भारतीय चलनात सध्या याची किंमत सुमारे १६ ते १७ हजार रुपयांच्या घरात आहे. लवकरच हे उत्पादन प्रत्यक्ष बाजारपेठेत दाखल होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.