लवंगी मिरची : दिवाळीचा उतारा
दिवाळीला व्यापारी मंडळी नवीन हिशोब सुरू करतात. दिवाळी संपत आली की, तुम्ही-आम्हीपण लगेच हिशोबाला लागतो. ही दिवाळी किती रुपयांना पडली याचा अंदाज काही केल्या येत नाही. कपडे, किराणा, अन्न पचविण्यासाठी लागलेली औषधी, बहिणींना दिलेली ओवाळणी, फटाक्यांना लागलेले पैसे; या सर्वांमध्ये आणखी एक खर्च लावायचा राहून गेलेला असतो, तो म्हणजे दिवाळीनंतरचा उतारा. तेच गोड जेवण, तोच गोड फराळ, बिना लसणाकांद्याच्या भाज्या, तळलेले पदार्थ यावर उतारा म्हणून सणसणीत शेरव्याची काळ्या मसाल्यातील भाजीच पाहिजे. त्याच्याबरोबर गावरान हिरव्या मिरच्यांचा लसूण घालून पाटा-वरवंट्यावर रगडून केलेला ठेचा असावा. सोबत फोडणी टाकलेली आणि अलगद पातोडा निघणारी मुगाची भाकरी असावी. अहाहा! काय बहार येते नाही?
आम्ही कच्चा कांदा असे वाटले ना तुम्हाला? कांदा, लिंबू, शेंगदाण्याची लालजर्द चटणी, तिखटजाळ बेसन, लसणाचा तडका हे सर्व पदार्थ अॅक्सेसरीमध्ये आहेत. असे बहारदार जेवण जेवताना थेट डोक्याच्या मागील भागातून एक घामाची धार निघते आणि कानाला वळसा घालून गळ्याच्या घाटीजवळ रेंगाळते, तिची पर्वा करू नये. जिभेचा सर्वांगाने जाळ होतो त्याचीही पर्वा करू नये. असले जेवण घरी मिळत नसते, त्याचीही पर्वा करू नये. दिवाळीचा उतारा घडवून आणायचा म्हणजे काय? गोडाची चव घालविण्यासाठी खमंग आणि तिखटच पाहिजे.
मधुमेही मंडळींना मात्र दिवाळीचा उतारा करण्यासाठी गोळ्यांचा खुराक वाढवावा लागतो. झुगारून दिलेले बंध पुन्हा सावरावे लागतात. सरकारी कर्मचारी दिवाळीनंतर अत्यंत काटकसर करताना दिसतात. बोनस बंद झाल्यापासून दिवाळी आधीच अवघड झाली आहे. भाऊबीजेच्या दिवशी श्रीखंडात पडलेल्या अतिरिक्त जायफळाचा परिणाम पुढे चार-पाच दिवस राहतो. सुस्ती काही केल्या जात नाही. काही ग्रॅम जायफळ डोक्यावर इतका मजबूत ताबा मिळवू शकत असताना, काही लोक इतरत्र इतके व्यर्थ पैसे का खर्च करतात, हेच समजत नाही. असो.
सांगायचा उद्देश हा की, दिवाळीचा उतारा आवश्यक आहे. शक्यतो, दिवाळीचा उतारा करण्यासाठी शेतातच जावे. आपले स्वतःचे शेत नसेल तर ज्याच्याकडे शेत आहे त्याला घेऊन त्याच्या शेतात जावे. मसाला तिथेच तयार करावा. रटरट शिजणार्या भाजीचा खमंग वास आसमंतात दरवळून जातो. चुलीवर भाजलेली भाकरी परातीत कुस्करून खावी. शेवटी रस्सा पिऊन घ्यावा. चित्रकला, साहित्य, संगीत, गायन, वादन इत्यादींची जाण असणे म्हणजेच काय विद्वतेचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण आहे काय? जेवणाखाण्यातील जाणकार काय विद्वान नसतात काय? रोजच्या जेवणावर प्रेम करणे हासुद्धा तपश्चर्येचा भाग नव्हे काय? 'जाणिजे यज्ञकर्म' असे उदरभरणाला म्हणणारी आमची संस्कृती श्रेष्ठच आहे.
उदरभरणाचा यज्ञ मात्र निष्ठेने चालविला पाहिजे. दिवाळीचा उतारा हाही एक वार्षिक सणच आहे. फक्त दिवाळीचा उतारा करताना सोबत काही गोडधोड घेऊन जाऊ नये. फक्त आणि फक्त शेतामध्ये मिळणार्या भाज्या याच शिजवून घ्याव्यात तरच या जेवणाची मजा येते आणि जर सोबत पाच-दहा मित्रांचा ग्रुप असेल तर 'दिवाळीचा उतारा' अविस्मरणीय होऊन जातो. ज्यांनी आतापर्यंत याचा अनुभव घेतलेला नाही, त्या लोकांनी येत्या चार-पाच दिवसांमध्ये हा प्रयोग करायला हरकत नाही. यावर्षी जितक्या लोकांना तुम्ही सोबत घेऊन जाल, ते सगळे लोक पुढच्या वर्षी दिवाळीपेक्षाही दिवाळीच्या उतार्याची अधिक आतुरतेने वाट पाहतील, हे नक्की. शेवटी काय आहे, तर माणसांनी एकत्र येणे आणि आनंद साजरा करणे!

