Nashik airport expansion | नाशिकच्या विकासाचे उड्डाण

Nashik airport expansion
Nashik airport expansion | नाशिकच्या विकासाचे उड्डाण
Published on
Updated on

राहुल रनाळकर

नाशिक विमानतळाचा 572 कोटींचा विस्तार केवळ कुंभमेळ्यापुरता प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक परिवर्तनाचा निर्णायक टप्पा ठरणार आहे. वाढती हवाई कनेक्टिव्हिटी नाशिकला प्रादेशिक विकासाच्या केंद्रस्थानी नेऊ शकते.

नाशिकच्या विमानतळाच्या विस्ताराचा निर्णय हा केवळ स्थानिक नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. नाशिक हे केवळ धार्मिक शहर नाही, तर उत्तर महाराष्ट्राचे प्रशासकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी नाशिक हे प्रमुख ग्रोथ सेंटर आहे. अहिल्यानगर पुण्याच्या जवळ असल्याने त्याचे आर्थिक नाते पुण्याशी अधिक घट्ट आहे; परंतु उर्वरित तिन्ही जिल्ह्यांसाठी नाशिक हीच विकासाची मुख्य नाळ आहे. समृद्धी महामार्गामुळे संभाजीनगर आणि जळगावला मोठा फायदा झाला असला, तरी हवाई कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत नाशिकची भूमिका अधिक व्यापक आहे. जळगावचे विमानतळ कार्यरत झाले असले, तरी मोठ्या प्रमाणावर प्रवासी व कार्गो वाहतुकीसाठी सक्षम विमानतळ म्हणून नाशिकची क्षमता अधिक आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाच्या विस्तारासाठी 572 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक, पर्यटक, अभ्यासक, साधू-संत आणि परदेशी नागरिक नाशिकमध्ये येतात. अशावेळी सक्षम विमानतळ नसणे ही मोठी उणीव ठरली असती. आता विस्तारित धावपट्टी, सुधारित टर्मिनल, आधुनिक तंत्रज्ञान आणि वाढीव पार्किंग क्षमता यामुळे नाशिकला मोठ्या विमानांची वाहतूक हाताळता येईल. याचा थेट फायदा पर्यटन, हॉटेल उद्योग, लॉजिस्टिक्स, आरोग्यसेवा आणि व्यापाराला होईल.

वाढवण बंदराचा फायदा नाशिकला मिळणार आहे. रस्ते, रेल्वे आणि आता हवाई मार्ग या त्रिसूत्रीमुळे नाशिकचा औद्योगिक नकाशा बदलू शकतो. उत्पादन क्षेत्र, फार्मा, फूड प्रोसेसिंग, वाईन इंडस्ट्री, आयटी आणि स्टार्टअप्ससाठी नाशिक आकर्षक गंतव्य बनू पाहतेय, ते अशा विकासाच्या गतीमुळे. 2023 मध्ये नाशिक विमानतळावर प्रवाशांची संख्या केवळ एक लाख होती. ती 2025 मध्ये तब्बल 3 लाख 40 हजारांवर पोहोचली आहे. ही शहराच्या बदलत्या आर्थिक चेहर्‍याची साक्ष आहे. वाढती कनेक्टिव्हिटी म्हणजे वाढत्या संधी. व्यवसाय, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी.

नाशिकला आयटी हब बनण्याची प्रचंड क्षमता आहे; मात्र अपुर्‍या हवाई कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या कंपन्या येथे येण्यास साशंक होत्या. आंतरराष्ट्रीय क्लायंट, तज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांना वेगाने पोहोचता यावे लागते. त्यासाठी थेट विमानसेवा आवश्यक असते. आता हा अडसर दूर होत असल्याने नाशिककडे नव्या द़ृष्टीने पाहिले जाईल. अनेक प्रतिभावान तरुणांना चांगल्या पॅकेजसाठी पुणे, मुंबई, बेंगळुरू किंवा हैदराबादला जावे लागते. नाशिकमध्येच आयटी, फार्मा, लॉजिस्टिक्स आणि स्टार्टअप्सचा विस्तार झाला, तर स्थानिक पातळीवरच दर्जेदार रोजगारनिर्मिती होईल. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधून प्रकल्पाला गती दिली. हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी मैलाचा दगड ठरणारा निर्णय आहे.

यापुढील टप्पा म्हणजे नाशिकला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळणे. देशांतर्गत वाहतुकीबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि कार्गो वाहतुकीची क्षमता येथे विकसित करणे आवश्यक आहे. विशेषतः कृषी मालाच्या निर्यातीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कांदा, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ थेट परदेशात पाठवता आले, तर शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल आणि कृषी अर्थकारण मजबूत होईल. विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार्याने हा टप्पा गाठता येऊ शकतो. कार्गो हब विकसित केल्यास नाशिक हे पश्चिम भारतातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स सेंटर बनू शकते. एकूणच, नाशिक विमानतळाचा विस्तार हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नसून तो उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक पुनरुज्जीवनाचा मार्ग आहे. योग्य नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय समन्वय राहिला, तर नाशिक येत्या दशकात महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news