म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान, अशा स्वरूपाचे एक नाट्यगीत प्रसिद्ध आहे. या नाटकात 75 वर्षे वय असलेल्या एका जराजर्जर वृद्धाशी शोडशवर्षीय म्हणजेच 16 वर्षांच्या तरुणीचा विवाह करण्याचे घाटत असते. आयुष्याच्या नाटकाचा उत्तरार्ध संपत असताना शेवटचे काही प्रवेश बाकी असतात. अशा जराजर्जर माजी आमदारांनाही सत्तासुंदरीचा मोह सुटत नाही. अशाच एका 82 वर्षांच्या माजी मंत्र्याचा तिकीट वाटपामध्ये पत्ता कट करण्यात आला आणि ते चांगलेच संतापले. ही बातमीसुद्धा कदाचित त्यांना वाचण्याइतपत द़ृष्टी नसेल. कदाचित ही बातमी त्यांच्या परतवंडांनी त्यांना वाचून दाखवली असेल. कदाचित कोण काय बोलत आहे, हे पण त्यांना ऐकू येत नसेल, तरीही उमेदवार मीच हा अट्टहास मराठी माणसाला शोभून न दिसणारा आहे. ‘जगावे जगावे नेटाने जगावे’ हेच जीवनाचे सूत्र मानून शेवटच्या क्षणापर्यंत त्या खुर्चीवर मीच बसलो पाहिजे हा हट्ट माणसाला कुठपर्यंत घेऊन जातो ते पाहा. या वयात व्यक्तीची भूमिका, ‘असावे संसारी, नसावे संसारी’ अशी असली पाहिजे, असे संत सांगून गेले आहेत.
वयोवृद्ध झाल्यामुळे या व्यक्तीच्या मुलाला, जो की पन्नाशीत असेल किंवा नातवाला, जो की तिशीत असेल, त्याला पक्ष उमेदवारी देऊ शकतो. वयस्कर झालेले राजकारणी लोक अजूनही राजकारणाचा नाद सोडत नाहीत हे आपल्या राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आपली मतदारसंघावर अजूनही घट्ट पकड आहे, असा प्रत्येक माजी आमदाराला विश्वास असतो. त्याला तसे वाटणे साहजिक आहे, कारण तो घराबाहेर पडला की, लोक त्याला वाकून नमस्कार करत असतात. बर्याचशा लोकांना तो व्यक्तिगत ओळखत असतो. बरेचसे चेहरे त्याला पाहिल्यासारखे वाटतात; पण नाव आठवत नसते. शेवटी शरीरच ते. कुणीही इथे अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाही. गात्रे शिथिल होणारच आहेत आणि देह थकत जाणार आहे, हे माहीत असूनही अजूनही उमेदवार असण्याचा जो उत्साह आहे, तो थक्क करणारा आहे.
असा वयोवृद्ध उमेदवार उभा राहिला तर जनतेने काय करावे, हा एक मोठाच प्रश्न आहे. उमेदवाराचे वय आणि शारीरिक स्थिती पाहता तो पुढील पाच वर्षे सुखरूप काढेल, अशी शक्यता अजिबात नसते. टेकू दिल्याशिवाय न चालणारा असा हा माजी आमदार प्रचार करणार तरी कसा आणि निवडून आल्यानंतर जनतेची कामे करणार तरी कसा, असे प्रश्न जनतेच्या मनात निश्चितच उभे राहत असतील. देशाचा आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणारे मतदार खूप आहेत. समजा, आपण या वृद्ध व्यक्तीला मतदान केले आणि हा निवडून आला तर येत्या एक ते दोन वर्षांत पोटनिवडणूक नक्की लागेल, हे जनतेला माहीत असते. कोणतीही निवडणूक भलेही ती पोटनिवडणूक असो, शासन व्यवस्थेचा खर्च हा होतच असतो. असा शासकीय खर्च अनाठायी होऊ नये म्हणून बरेच लोक या व्यक्तीला मतदानच करणार नाहीत. एखाद्या मोठ्या पक्षाचे अधिकृत तिकीट या उमेदवाराला मिळाले तर त्याचे पक्षांतर्गत विरोधक मात्र खूश होत असावेत. समजा, हा निवडून आला तर ते मिरवणुकीत जल्लोषाने नाचत असणार हे नक्की. याचे कारण म्हणजे एवढा वयोवृद्ध माणूस आमदार झाला आणि निवडून आला तर एक ते एक दोन वर्षांत पुन्हा पोटनिवडणूक लागून आपल्याला उमेदवारीचा चान्स आहे, हे चाणाक्ष राजकीय कार्यकर्त्यांच्या लगेच लक्षात येत असते.